पौड : ‘‘आज देशभरातच नव्हे, संपूर्ण जगात कायद्याची व्याप्ती अधिकाधिक वाढत आहे. समाजाला कायद्याची परिणामकारकता व प्रभाव वाढविणाऱ्या विधी सल्लागारांची आवश्यकता आहे. त्यामुळे बुद्धिमान व प्रतिभावान विद्यार्थ्यांना कायद्याच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत,’’ असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले.मुळशी तालुक्यातील शिंदेवाडी (कासारआंबोली) येथील अॅड. राम धुमाळलिखित ‘विधी क्षेत्रातील शिक्षण व करिअर’ या पुस्तकाचे प्रकाशन अॅड.निकम यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. ए. पाटील, सजग नागरी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, सिंहगड विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एच. जी. कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी विभागप्रमुख दुर्गांबिनी पटेल, ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी, माजी खासदार नानासाहेब नवले, अशोक मोहोळ, आत्माराम कलाटे, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे, अल्पना वरपे, सभापती कोमल वाशिवले, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, अंजली कांबळे, बाळासाहेब बोडके, सुभाष अमराळे, शांताराम इंगवले, नानासाहेब शिंदे, रवींद्र कंधारे, रामचंद्र दातीर, सुनील वाडकर, राम गायकवाड, स्वाती ढमाले, सुनील आमले, बाळासाहेब अमराळे, विलास अमराळे उपस्थित होते.निकम म्हणाले, की आज आयटीसारख्या करिअरच्या अनेक नवीन पर्यायाकडे नवी पिढी व पालक आकर्षित होताना दिसतात. मात्र, समाजासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या विधी शाखेची मात्र उपेक्षाच होताना दिसत आहे. राम धुमाळ म्हणाले, की ग्रामीण भागातील विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून हे परिपूर्ण पुस्तक लिहिलेले असून, तंत्रज्ञानामुळे विधी क्षेत्रात करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
आंतराष्ट्रीय पातळीवर विधी क्षेत्रात मोठ्या संधी - उज्ज्वल निकम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 2:34 AM