पुणे : २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करून देतो, असे आमिष एका भोंदूने महिला व्यावसायिकाला दाखवले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने भोंदू व त्याच्या साथीदारांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांकडे तक्रार केली.
तन्वीर शामकांत पाटील, शिवम गुरू, सुनील राठोड आणि आनंद स्वामी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार ९ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर या कालावधीत घडल्याचे महिला व्यावसायिकाने तक्रारीत नमूद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण पेठ येथे वास्तव्यास असलेल्या महिलेचे व्यावसायिक भागीदार अंकितकुमार पांडे यांची जमीन खरेदीच्या व्यवहारातून आरोपी तन्वीर पाटील याच्याशी ओळख झाली होती. पुढे तन्वीरने शिवम गुरूजी, सुनील राठोड आणि आनंद स्वामी यांच्याशी पांडे यांची ओळख करून दिली. आरोपींनी पांडे आणि त्यांच्या ओळखीचे असलेले राजपाल जुनेजा यांच्यासह तक्रारदार महिलेला २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करून देतो, असे आमिष दाखविले.
दरम्यान, यानंतर १३ सप्टेंबर रोजी आरोपी तक्रारदार महिलेच्या घरी आले. त्यांना रिकाम्या टाकीत २० लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी खोलीत धूर केला. पैशांमध्ये वाढ हाेण्यासाठी हरिद्वार येथे जाऊन विधी करावा लागेल, असे सांगितले आणि टाकीतील २० लाख रुपये घेऊन त्या सर्वांनी तेथून पळ काढला.