बारामती : संकलित होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या गंभीर होत आहे. बारामती नगरपालिकेच्या हद्दवाढीनंतर शहरात जवळपास ओला व सुका असा ३२ टन कचरा संकलित होतो. या कचऱ्यावर प्रक्रिया करून ‘हरित कोळसा’ करण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे कचऱ्यापासून सुटणाऱ्या दुर्गंधीचा त्रास होणार नाही. तसेच दररोजच्या कचऱ्याची विल्हेवाट लागणार आहे. हा कोळसा सिमेंट कंपन्यांना लागतो. त्यामुळे पालिकेला कचऱ्यापासून आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. नगरपालिकांच्या हद्दीत कचऱ्यापासून कोळसा निर्मितीचा प्रकल्प राबविणारी बारामती पालिका पहिलीच ठरणार आहे. या प्रकल्पाची सर्व तयारी झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीच्या अहवालानंतर प्रस्तावित जागेवर कोळसा निर्मितीचा प्रकल्प राबविला जाईल. कचरामुक्त बारामतीला यामुळे मूर्त स्वरूप येईल, असे नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी सांगितले. (वार्ताहर)बायोगॅसपासून वीजनिर्मिती...ओल्या कचऱ्याची विल्हेवाट बायोगॅस प्रकल्पात लावण्यात येणार आहे. सध्या ५ टन ओला कचरा शहरातील सर्व्हे नं. २२०मध्ये उभारण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पासाठी वापरला जातो. बायोगॅसद्वारे वीजनिर्मिती केली जात आहे. या वीजनिर्मितीचा वापर पथदिव्यांसाठी केला जात आहे. त्यामुळे अन्य भागांतदेखील करण्यात येणाऱ्या बायोगॅस प्रकल्पाद्वारे वीजनिर्मिती करण्यात येईल.सध्या बारामती शहरात कचरा संकलित करण्याची समस्या आहे. पूर्वीच्या जळोची येथील २२ एकरांतील कचरा डेपो रस्ते विकास महामंडळाला कराराने देण्यात आला आहे. महामंडळाने ही जागा पालिकेकडून मागितली आहे. ढाकाळे (ता. बारामती) येथे पर्यायी २२ एकर जागेवर कचऱ्याचा पर्याय शोधला आहे. मात्र, तेथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान अवलंबणार असल्याचे सांगितले. या संदर्भात मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सांगितले की, ढाकाळे येथील जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या चार जणांच्या समितीने पाहणी केली आहे. जवळ असलेले पाण्याचे स्रोत, वन्यजीवांसह अन्य पर्यावरणाला धोका होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे तेथे विरोध आहे. प्रत्यक्षात शहरातील कचरा त्या ठिकाणी टाकला जाणार नाही. संकलित होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी १५ टन कचऱ्यापासून ‘हरित कोळसा’ तयार करण्यात येणार आहे.सिमेंट कंपन्यांना दगडी कोळशाला पर्याय म्हणून हा कोळसा उपयुक्त ठरतो. त्याचे दरदेखील परवडणारे असतात, असा प्रकल्प नवीन मुंबई महानगरपालिकेने राबविला आहे. त्यामुळे बारामती पालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पाला चालना देण्यात येणार आहे. नगरोत्थान योजना, नगरपालिका निधीतून हा प्रकल्प मार्गी लावता येईल का, याबाबत सध्या विचार सुरू आहे.दररोज शहरातून ३२ टन कचरा गोळा होतो. संकलित झालेला ओला व सुका कचरा शहरातच वेगवेगळा केला जाणार आहे. शहरात बारामती ग्रामीण, रुई, जळोची, तांदूळवाडी या उपनगरांत बायोगॅस प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट दररोज लागणार आहे. २० टक्के कचऱ्यावर गांडूळखत, सेंद्रिय खताचा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव आहे. कचऱ्याचे विकेंद्रीकरण करून दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यामुळे कचरा साठविण्याची समस्या सुटणार आहे. या प्रकल्पाला ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ५० टक्के अनुदान मिळविण्याचा प्रयत्न आहे. प्रकल्पासाठी कमी जागा लागणार आहे. त्यामुळे ढाकाळेसारख्या ग्रामीण भागात कचरा डेपोमुळे दुर्गंधी सुटेल, हा नागरिकांपुढे असलेला प्रश्न मार्गी लागणार आहे.
कचऱ्यापासून तयार करणार ‘हरित कोळसा’
By admin | Published: October 10, 2015 5:08 AM