- लक्ष्मण मोरे पुणे : दारात-अंगणात, सोसायटीत आणि आसपासच्या पानगळीचे नेमके करायचे काय, असा प्रश्न असतो. पुणेकरांनी हा प्रश्न कल्पकतेने सोडवताना या सुकलेल्या पानांच्या आधाराने फळभाज्या, पालेभाज्या आणि फळांचे उत्पादन घेण्याची किमया सााधली आहे. ‘ब्राऊन लिफ’ या व्हॉट्सअॅप गृपच्या माध्यमातून चक्क पानगळीची देवाणघेवाण करण्याची मोठी चळवळ पुण्यात उभी राहिली आहे. आता या गटाची सदस्यसंख्या सुमारे ६०० वर गेली असून त्यात दिल्ली, हैदराबाद ते कोल्हापूर, सांगली आणि मुंबईतलेही ‘पानगळप्रेमी’ एकत्र आले आहेत.शहरीकरणाच्या रेट्यात सिमेंटचे जंगल अटळ ठरले आहे. पण त्यातही बंगल्याच्या आवारात, घरांच्या गच्चीत, इमारतीच्या छतांवर परसबाग करुन अनेकजण बागकामाची हौस भागवतात. एरंडवण्यात राहणाऱ्या आदिती देवधर यांच्या सोसायटीत पानगळीचा खच साचत असे. कामवाल्या मावशी त्याला काडी लावायच्या, यातून धुराची समस्या होत असल्याने एक दिवस देवधर यांनी त्यांना पाने न जाळता पोत्यात भरुन ठेवण्यास सांगितले. या पोत्यांचा ढिग जमा झाल्यावर त्याचे काय करायचे, असा नवा प्रश्न निर्माण झाला. त्याची सोडवणूक करताना पानगळीची देवाणघेवाण करण्याची वेगळी कल्पना पुढे आली. व्हॉट्स अँपवरुन देवधर यांनी पानगळीची समस्या मांडल्यानंतर त्याला सूस रस्त्यावर राहणाºया सुजाता नाफडे यांनी प्रतिसाद दिला. नाफडे यांनी घराशेजारील मोकळी जागा बिल्डरकडून भाड्याने घेऊन तेथे त्यांच्या तीन कुटुंबांसाठी पुरेल एवढी सेंद्रिय शेती सुरु केली. पूर्णपणे राडारोडा पडलेल्या या जागेत माती न वापरता केवळ ओला कचरा जिरवून त्या फळभाज्या, पालेभाज्या पिकवतात. नाफडेंनी देवधर यांच्याकडून पाच पोती सुकलेली पाने खतासाठी घेतली. सुकलेली पानांचे नाफडे करतात तरी काय, हे कुतूहल शमवण्यासाठी देवधर त्यांच्याकडे पोचल्या. त्यांची फुललेली बाग पाहून त्यांना या संदर्भात अधिक व्यापक काम करण्याची गरज जाणवली. यातूनच सुरु झाली पानगळ वाटून घेणाºया माणसांची खास पुणेरी चळवळ.एरवी केवळ टाकाऊ कचरा म्हणून पाहिल्या जाणाऱ्याचे पानांमध्ये पोषक द्रव्ये असतात. जमिनीला त्याची आवश्यकता असते. पाने जाळल्याने पर्यावरणाला घातक कार्बन मोनॉक्साईड तयार होतो, ते वेगळेच. यावरचे उत्तर ‘ब्राऊन लिफ’ नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप होय. नोव्हेंबर ते मे महिन्यात होणारी पानगळ गोळा करुन ती ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत पोचवण्याचे काम हा ग्रुप करतो. पाने जमा झालेले सदस्य गृपवर माहिती देतात. आवश्यकता असणारे ही पाने घेऊन जातात. अशा प्रकारे आता ट्रकच्या ट्रक भरुन पानांची देवाणघेवाण बागकामासाठी होते आहे. या कामाची व्याप्ती वाढविण्यासाठी फेसबुक पेज आणि संकेतस्थळही तयार झाले आहे. अनेकांनी त्यांच्या फार्म हाऊसवर आणि शेतामध्येही ट्रक भरुभरुन पाने नेल्याची उदाहरणे असल्याचे देवधर सांगतात. ====मोठ्या आकाराची पाने साठवण्यासाठी जास्त पोती लागत. त्यामुळे गृपच्या सदस्या रत्ना गोखले यांनी त्यांच्या पतीसह मिळून ‘लिफ क्रशर’ यंत्र बनविले. हे यंत्र पानांचा भुगा करते. पाच-सहा पोत्यांमधील पानांचा भुगा अवघा एका पोत्यात मावतो. ====सुरुवातीला पाने नेण्यासाठीचा प्रतिसाद कमी होता. परंतू, पानांचा वापर करुन फुलवलेल्या बागांचे, पिकांचे फोटो अनेकजण गृपवर टाकायला लागल्यावर अनेकांचा उत्साह वाढला. पानांचा ‘कचरा’ हा शब्द गायब झाला. मिलेनियम शाळा, नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूट, कात्रज दूध डेअरीसारख्या संस्थाही या गृपकडून पानगळ नेऊन बागा फुलवत आहेत.
पानगळीमधून पुण्यात साकारताहेत ‘हिरवे कोपरे’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 7:00 AM
दारात-अंगणात, सोसायटीत आणि आसपासच्या पानगळीचे नेमके करायचे काय, असा प्रश्न असतो...
ठळक मुद्देपानगळ वाटून घेणारी पुणेरी माणसं-‘ब्राऊन लिफ’ व्हॉट्स अॅप गटाने साधली किमयाकचऱ्याचे रुपांतर केले खतात