लाेकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा करणारे सर्वाधिक प्रकल्प पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आहेत. या ऑक्सिजन प्लॅन्टपासून ते संबंधित रुग्णालयापर्यंत वाहतूक सुरळीत व वेगवान होण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. त्यासाठी ऑक्सिजन कोऑर्डिनेशन टीम स्थापन केली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे चाकण परिसरातील ऑक्सिजन प्लॅन्टपासून रुग्णालयापर्यंतच्या वाहतुकीला कमीतकमी वेळ कसा लागेल, यासाठी ग्रीन कॉरिडॉरची संकल्पना पुढे आली. प्लॅन्टच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून २४ तास सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. टँकरला पाच सशस्त्रधारी एस्कॉर्ट, तसेच वाहतूक विभागाचे एस्कॉर्ट नेमण्यात आले आहेत. ग्रीन कॉरिडॉर तयार करून ऑक्सिजनच्या सुरळीत वाहतुकीसाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोऑर्डिनेशन टीम स्थापन केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली. कोऑर्डिनेशन टीममध्ये हिरेमठ यांच्यासह परिमंडळ एकचे उपायुक्त मंचक इप्पर, परिमंडळ दोनचे उपायुक्त आनंद भोईटे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, महामार्गचे पोलीस अधीक्षक, पुणे शहरचे पोलीस उपायुक्त, तसेच संबंधित प्रांताधिकारी यांचा या टीममध्ये समावेश आहे.