हडपसर : सांडपाण्याचा पुनर्वापर करून भैरोबानाला येथील सोपानबाग येथे एक-दोन नव्हे तब्बल हजारो झाडे फुलविली. पावसाळ्यात माती वाहून जाऊ नये म्हणून बांबूची लागवड केली आहे. तसेच मोर, चिमणी आणि इतर पक्ष्यांसाठी मका आणि सूर्यफुलाची लागवड केली. सांडपाण्यावर फुलविलेली देवराई परिसरातील नागरिकांना आकर्षित करू लागली आहे. हाच उपक्रम आता बंगलोरमध्ये राबविणार आहे. बंगलोर येथे सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी नुकतीच तेथे भेट देऊन माहिती दिल्याचे निवृत्त सैनिकांनी स्थापन केलेल्या ग्रीन थम्बचे अध्यक्ष माजी निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी दिली.
कर्नल पाटील म्हणाले की, भारतीय सेना दलाचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची भेट घेऊन पर्यावरण संदर्भात चर्चा केली. ग्रीन थम्बच्या माध्यमातून मागील २७ वर्षांमध्ये राबविलेल्या प्रकल्पाची माहिती त्यांच्यासमोर सादर केली. येथील सोपानबाग येथे दोन किमी नाल्यातील गाळ काढून स्वच्छता केली आहे. नाल्यातील सांडपाण्याचा वापर करून देवराई फुलविली आहे. तसेच या ठिकाणी सहा तलावाची निर्मिती करून जमिनीतील पाण्याचे पुनर्भरण केले आहे.
देशामध्ये सुमारे ६०-७० कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. त्यातील पुणे कॅन्टोन्मेंट आणि देहू रोड कॅन्टोन्मेंट असे दोन आहेत. त्या ठिकाणी लोकसहभाग आणि सीएसआर फंडातून असे उपक्रम राबविता येतील. त्याचबरोबर माजी सैनिकांच्या ग्रीन थम्बच्या माध्यमातून असे प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेऊन तसा प्रस्ताव कार्यालयाकडे पाठवावा, असेही सुचविले आहे. दरम्यान, खडकवासला धरणातील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढविली. गाळ शेतकऱ्यांना मोफत देऊन त्यांच्या शेतीची उत्पादन क्षमता वाढविली, धरणाच्या काठावर वृक्षवल्ली फुलविली असल्याची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
(फोटो - हडपसर ग्रीन थंब नावाने)