प्रसाद कानडे
पुणे : प्रस्तावित ‘पुणे - बंगळुरू ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’च्या (pune Bengaluru greenfield corridor) डीपीआरचे काम सुरू झाले. नव्याने तयार होणाऱ्या ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला पुणे - मुंबई द्रुतगती मार्गाशी जोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तसा प्रस्तावदेखील दिला आहे. येत्या काही दिवसात त्यावर निर्णय अपेक्षित आहे. पुणे - बेंगळुरू ‘ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’ला पुणे - मुंबई द्रुतगती मार्गाला जोडल्याने मुंबई - बेंगळुरू हा रस्ते प्रवास गतिमान होणार आहे. (pune bangalore city will be 93 kilometers closer)
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे - बेंगळुरू ग्रीनफिल्ड कॉरिडॉरचे काम करणार आहे. हे करीत असताना पीएमआरडीएकडे (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) खेड शिवापूरच्या हद्दीत असलेल्या जागेची मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रस्तावित रिंगरोडलादेखील ग्रीनफिल्ड कॉरिडॉरशी जोडण्याचा प्रस्ताव एनएचएआयने दिला आहे. त्यामुळे पुण्यातून धावणाऱ्या वाहनाची संख्या कमी होण्यास मदत मिळणार आहे. येत्या काही दिवसांत अधिकृतपणे याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
कसा असणार ग्रीनफिल्ड कॉरिडॉर :
भारतमाला परियोजना-दोन अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देशात तीन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करणार आहे. हे सर्व रस्ते ‘ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’ असणार आहेत. यात पुणे-बंगळुरू महामार्गाचा समावेश आहे. सध्याचा पुणे - बंगळुरू महामार्ग हा ८३८ किलोमीटर लांबीचा आहे. ‘ग्रीनफिल्ड’ ७४५ किलोमीटर अंतराचा असणार आहे. यामुळे पुणे आणि बंगळुरू ही दोन शहरे जवळपास ९३ किलोमीटरने जवळ येणार आहेत. प्रवासाचा वेळ दीड ते दोन तासांनी वाचणार आहे. जवळपास ४० हजार कोटी रुपये खर्चून हा आठपदरी महामार्ग बांधला जाणार आहे. ताशी १२० किलोमीटर वेगाने या महामार्गावरून गाड्या धावतील.
पुणे-मुंबई द्रूतगती मार्गवरचे उर्से व पुणे-बंगळुरू ग्रीनफिल्ड कॉरिडॉरवरील खेड शिवापूर गावाला जोडण्याचा विचार सुरू आहे. यानिमित्ताने पीएमआरडीएच्या रिंगरोडला ग्रीन फिल्ड कॉरिडॉर जोडले जात आहे. त्यामुळे बेंगळुरू-मुंबई थेट जोडले जाईल. शिवाय रिंग रोडमुळे शहरातील वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. प्रवास वेगवान तर होईलच, शिवाय शहरातील वाहतूक कोंडीदेखील कमी होण्यास मदत मिळणार आहे.
ग्रीनफिल्ड कॉरिडॉर म्हणजे काय?
‘ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’ हा पूर्णत: नवा द्रूतगती महामार्ग असतो (what is greenfield corridor). जुन्या रस्त्याचे विस्तारिकरण यात केले जात नाही. या मार्गावरून ताशी १२० किलोमीटर वेगाने वाहने धावू शकतील. हे महामार्ग चार किंवा आठपदरी असतात. रस्ताच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाते. त्यामुळे प्रदूषण पातळी कमी राखता येते.