करडे (ता .शिरूर ) येथील श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सन १९९५ च्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. तब्बल पंचवीस वर्षांनंतर आपले वर्गबंधू-भगिनी भेटल्याने अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला तर अनेकांना आनंदाश्रू अनावर झाले होते.
हा स्नेहमेळावा आयोजित करताना सर्व जुन्या मित्र-मैत्रिणींची संपर्क करणे गरजेचे होते, परंतु आज मोबाईलसारखे प्रभावी माध्यम हाताशी असल्याने ते सहज शक्य झाले. राजेंद्र कोरेकर आणि नेहा तळेकर या वर्गबंधू-भगिनींनी यासाठी व्हॉट्सॲप ग्रुपची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करण्यात आले आणि मग स्नेहमेळाव्याचे नियोजन झाले. स्नेहमेळाव्याच्या दिवशी सर्वजण नटून-थटून ठरलेल्या वेळेच्या अगोदर पोहचले होते. अगदी शाळेला जावे तसे !
सुरुवात राष्ट्रगीताने झाली. ग्रुपमधील माजी सैनिकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मग एकेकाचा परिचय व पंचवीस वर्षात झालेल्या घडामोडींची चर्चा झाली. त्यानंतर शाळेत खेळावे तसे खेळांचे आयोजन करण्यात आले. संगीतखुर्ची ,तळ्यात-मळ्यात अशा सामूहिक खेळांचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर रेल सफारी, बोटिंगचा एकत्रितपणे आनंद घेण्यात आला. खेळात श्यामराव मस्के, सरला पळसकर, संगीता सरोदे, अरुणा कापरे या विजय खेळाडूंना सन्मानित करण्यात आले . त्याचप्रमाणे 'राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी तानाजी धरणे धरणे, कोरोनायोद्धा बाळू वाळके व गणेश रोडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्वांच्या वतीने विद्यालयास आर्थिक मदत देण्यात आली. स्नेहभोजनाचा आनंद घेऊन परत भेटण्यासाठी सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.
राजेंद्र कोरेकर, नेहा तळेकर, अल्पना पलांडे, अरुण जगदाळे, सुभाष घुले, स्वाती थोरात, अनुराधा भोसले, सुवर्णा गारगोटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक अल्पना पलांडे यांनी, तर सूत्रसंचालन अरुण जगदाळे , स्वाती थोरात यांनी केले.
फोटो : करडे (ता. शिरूर ) येथील तब्बल २५ वर्षांनंतर भेटलेले माजी विद्यार्थी.