छत्रपती संभाजीराजे यांचे जन्मसाल १६५७ असल्याने तेवढ्या संख्येचे सीडबॉल किल्ले पुरंदर परिसरातील काळूबाई डोंगर, हरणी महादेव डोंगर, हरेश्र्वर डोंगर अन् नाथाचा डोंगर आदी ठिकाणी पेरत समगीर मित्रांनी शंभूराजे यांची ३६४ वी जयंती साजरी केली. साधारणतः आठ दहा दिवसांपूर्वी या तरुणांनी हा संकल्प करत कामकाजाला सुरुवात केली. कडुनिंब, सुभाबुळ, करंज, चिंच अशा कमी पाण्यावर अन् सहजगत्या उगवणाऱ्या जंगली वनस्पतींच्या तीन हजार बिया गोळा करुन त्यांचे माती कंपोस्ट खत, राख असे मिश्रण करून त्यात तीन चार बिया टाकत बीज गोळे तयार केले. हे गोळे सावलीत वाळवून नंतर भल्या पहाटे विविध डोंगररांगात वनखात्याने केलेल्या समपातळी चरात, वणव्याने झाडे जळालेल्या खडय्यात पेरले.१६५७ बीजे जरी अंकुरली नाहीत तरी राजेंच्या जयंती वर्षाइतकी म्हणजेच ३६४ झाडे जगली तरी राजांची जयंती साजरी केल्याचे समाधान मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. झाडे लावा झाडे जगवा, असा नुसता संदेश देण्यापेक्षा तो कृतीतून दाखवून देण्याचे अभिनंदनीय काम अजय आणि वैभव यांनी केले आहे.
फोटो.. डोंगररांगात सीडबॉल पेरताना अजय समगीर व वैभव समगीर.