पुणे: माझ्या जडणघडणीत विद्यापीठ रुजले असून, विद्यापीठाने केलेला सत्कार म्हणजे मला आईच्या शाबाकीसारखा वाटतो, असे मत मराठी विश्वकोश मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य साहित्य संस्कृती मंडळावर प्रा. डॉ. सदानंद मोरे यांची, मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी प्रा. राजा दीक्षित यांची, तर मराठी विश्वकोश मंडळाच्याच सदस्यपदी प्रा. सतीश आळेकर यांनी नियुक्ती झाल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून या सर्व विद्यापीठाच्या माजी प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राजा दीक्षित बोलत होते. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, विद्यापीठात काम करत असताना आम्हाला कायमच स्वातंत्र्य दिले गेले. विद्यापीठाची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले याचा मला आनंद आहे.
सतीश आळेकर म्हणाले, समाजात जे चांगले काम चालते त्याचा कोणता न कोणता धागा हा विद्यापीठाशी जोडलेला असतो. आम्ही याचा भाग आहोत ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी केले, तर आभार अधिष्ठाता डॉ. पराग काळकर यांनी मानले.
------
विद्यापीठाचे आज जगभरात नाव आहे. याचे कर्ताकरविता ही सर्व अभ्यासू मंडळी आहेत. त्यांच्यामुळेच विद्यापीठाची समाजाशी नाळ जोडली जाते.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
-----