पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असून या निमित्ताने रविवारी मार्केट यार्डातील दुकानेही बंद आहेत. मात्र अत्यावश्यक सेवेमुळे सदर दुकाने सोमवारपासून उघडण्यात येणार असून नागरिकांनी विनाकारण किराणा व भुसार मालाचा साठा करून ठेवू नये, असे आवाहन दि पूना मर्चंट चेंबरने पुणेकरांना केले आहे. पुणे शहराला पुढील दोन महिने पुरेल एवढा किराणा व भुसार मालाचा साठा व्यापाऱ्यांकडे असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, कुठलाही घाऊक अथवा किरकोळ व्यापारी हा चढ्या भावाने माल विकणार नाही, याचीही आम्ही दक्षता घेतली असल्याचे चेंबरने सांगितले.चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, पुणे मार्केटमध्ये धान्याची कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे नागरिकांनी पुढील एक-दोन महिन्याचा किराणा माल भरून ठेवण्याची घाई करू नये. पुणे मार्केटमध्ये सर्व मालाची आवक-जावक सुरळीत चालू असून, केवळ रविवारी जनता कर्फ्यूमध्ये सर्व व्यापारी सहभागी होऊन आपली दुकाने पूर्णवेळ बंद ठेवणार आहेत. शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत शहरात अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत सुरू रहावा याकरिता सोमवारपासून मार्केटमधील सर्व दुकाने सुरळीत सुरू ठेवण्यात येणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी केलेल्या आवाहनानुसार चेंबरच्यावतीने, पुढील पंधरा दिवस दोन लाख गरीब नागरिकांना पंधरा दिवस पुरेल एवढा तेल, तूरडाळ, मीठ व चहा पावडरचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये ५ टन तूरडाळ, १५ टन मीठ, १० हजार अर्धा किलो तेलाचे पाऊच व २०० ग्रॅमचे २ हजार किलो चहा पावडरचे पाऊच मंगळवारी वडकी नाला येथील शासकीय गोदामात पोहचविण्यात येणार असल्याचेही ओस्तवाल यांनी सांगितले.
पुढील दोन महिने पुरेल एवढा किराणा व भुसार : नागरिकांनी साठा करू नये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 8:18 PM
कुठलाही घाऊक अथवा किरकोळ व्यापारी हा चढ्या भावाने माल विकणार नाही.
ठळक मुद्देसोमवारपासून मार्केटमधील सर्व दुकाने सुरळीत सुरू ठेवण्यात येणार