लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘आधुनिक वाल्मिकी’ गजानन दिगंबर माडगूळकर ऊर्फ ‘गदिमा’ यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि ‘गदिमां’चे नातू सुमित्र माडगूळकर यांच्या हस्ते सोमवारी (दि. २२) झाले. माडगूळकर कुटुंबीयांसह पंचवीस जणांच्या उपस्थितीत छोटी पूजा करून स्मारकाचा भूमिपूजन सोहळा साजरा करण्यात आला.
कोथरूड येथील महात्मा सोसायटीत हे स्मारक होत आहे. या सोहळ्यास गदिमांच्या सून शीतल माडगूळकर, नातसून प्राजक्ता माडगूळकर, लीनता माडगूळकर, आलोक आंबेकर, पलोमा माडगूळकर, मृगांक आंबेकर, अविनाश माडगूळकर यांच्यासह नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, प्रा. उल्हास बापट, विनया बापट, प्रकाश भोंडे, प्रा. मिलिंद जोशी आदी उपस्थित होते.
“गदिमांचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. स्मारकाच्या माध्यमातून त्यांचे काम नव्या पिढीसमोर आणले जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसगार्मुळे स्मारकाच्या भूमिपूजनासाठी विलंब लागला. छोट्या स्वरूपात कार्यक्रम घेऊन स्मारकाच्या कामाला सुरुवात केली आहे. आम्ही शब्द पाळणारे आहोत. येत्या दोन वर्षात महाराष्ट्रासाठी भूषण ठरेल असे गदिमांचे स्मारक येथे उभारू,” असे महापौर मोहोळ या वेळी म्हणाले.
सुमित्र माडगूळकर म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून स्मारकासाठीचा लढा सुरू आहे. स्मारकाचे काम सुरू झाल्याने तो लढा आता काही अंशी संपलेला आहे. जेव्हा दोन वर्षांत प्रत्यक्षात स्मारक उभे राहील तो आमच्यासाठी आणि गदिमा प्रेमींसाठी आनंदाचा क्षण असेल. आत्तापर्यंत अनेकांनी स्मारकासाठी पाठपुरावा केला. ते होऊ शकले नाही. आता एका चांगल्या पद्धतीने कामाला सुरुवात झाली आहे. आता हे काम महापालिकेने लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे.
चौकट
असे असणार नियोजित गदिमा स्मारक
महात्मा सोसायटीजवळील साडेसहा एकर जागेमध्ये महापालिकेतर्फे प्रदर्शन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गदिमांच्या एकशेएकाव्या जयंती वर्षांत डिजिटल आधुनिक स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे. हे स्मारक केवळ पुतळा नसेल तर गदिमांचा जीवन आणि कलाप्रवास येथे अनुभवता येईल.
- प्रदर्शन केंद्र आणि गदिमा स्मारक
- कलाप्रदर्शनासाठी खास दालन
- प्रायोगिक रंगभूमीसाठी नाट्यगृह
- गदिमा स्मारकामध्ये गदिमांचा जीवनप्रवास आणि त्यांनी लिहिलेल्या साहित्याची माहिती देणारे दालन
- गदिमांनी वापरलेल्या वस्तूंचे दालन
- गदिमांच्या मराठी आणि हिंदी चित्रपटांचे दालन
- डिजिटल दालनामध्ये छायाचित्र पाहता येणार तसेच भावगीते व गीतरामायण ऐकता येणार.
-------