पुणे : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाचे ‘भूजल भवन’ हे राज्याचे मुख्यालय पुण्यात आहे. या कार्यालयाने वीजबिल थकवल्याने महावितरणने या संपूर्ण कार्यालयाची वीजजोडणी तोडली. त्यामुळे गेले दोन दिवस हे कार्यालय अंधारात असून शासकीय कामकाज ठप्प झाले आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे महासंचालक या कार्यालयात बसतात. या कार्यालयाचे सुमारे १४ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. प्रशासनाने वेळेत वीजबिलाची मागणी सरकारकडे न केल्याने निधी उपलब्ध झाला नाही. वारंवार नोटिसा देऊनही बिल भरले न गेल्याने अखेर महावितरणने कारवाई केली. यामुळे संगणक यंत्रणा बंद पडली. ‘बॅटरी बॅक-अप’ संपले. राज्यभरातील कार्यालयांशी असलेला दैनंदिन आणि ऑनलाइन संपर्क तुटला.
वीजबिल भरण्यासाठी शासनाकडे वेळेत निधीची मागणी न करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा यामुळे उघडकीस आला आहे. ‘भूजल’चे महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले की, वीजबिलासाठी निधी उपलब्ध झाला आहे. तातडीने बिल भरून लवकरच भूजल भवनचा वीजपुरवठा सुरू केला जाईल.