सांगवी (पुणे) : आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी तसेच रस्त्यावर उतरून अनेकदा आंदोलने केली. मागण्या पूर्ण होण्यासाठी कित्येक वर्ष झगडतोय पण आमच कुणीच ऐकत नाही, लक्ष देत नाहीत. आता तुम्ही तरी आमचे ऐकून घ्या आणि मागण्या पूर्ण करा असे भावनिक होऊन गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी थेट अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे निवेदनाद्वारे विनंती केली.
राज्यभरात जवळपास ७० हजार आशा स्वयंसेविका आहेत. तर जवळपास साडेतीन हजार गटप्रवतर्क आहेत. आशा ८० प्रकारची कामे करत असतात. त्या कामाच्या आधारवर त्यांना मोबदला दिला जातो. या मोबदल्याचा दर जुना असून तो आता वाढवण्याची गरज असल्याचे मत आशा स्वयंसेविकांनी व्यक्त केले. बारामती लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदारपणे मिशन बारामती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी भाजपने बारामती दौरा सुरू केला असून यासाठी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर जबाबदारी दिली आहे. निर्मला सीतारमण बारामती दौऱ्यावर आल्या होत्या.
दौऱ्यावर असताना निर्मला सीतारमण यांनी आशा स्वयंसेविकांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आशा स्वयंसेविकांनी मानधनाच्या ऐवजी वेतन मिळावे, आशा सेविकांना अनेक कामं मिळावीत, अशी थेट मागणी सीतारामण यांच्याकडे केली. तसेच मानधन तत्वावर काम करताना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागत असल्याच्या व्यथा मांडल्या.
मोरगाव येथील श्री मयूरेश्वर मंदिरात दर्शनासाठी निर्मला सीतारामण आल्या होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीने त्यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडून अनेक वर्षांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निवेदन दिले. यावेळी सीतारामण यांनी देखील आशा स्वयंसेविकांच्या भावना समजून घेत एका सेविकेला मिठी मारून लवकरच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.