पुणे : काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी (दि. ४) रात्री नागपुरातून पुण्यात दाखल झाले. शुक्रवारी (दि. ५) हडपसरमधील लक्ष्मी लॉन्स येथे ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्याची शक्यता आहे; मात्र या अनिश्चित भेटीला कोणी उपस्थित राहायचे, यावरूनच काँग्रेसमध्ये गटबाजी पाहण्यास मिळाली. राहुल गांधी यांच्या भेटीच्या पास वाटपावरून वाद झाले.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अशी गटबाजी झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे स्वरूप कसे असले पाहिजे, हा सर्व तपशील गांधी यांच्या दिल्लीतल्या टीमने ठरवला. गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित कोणी राहायचे, याचेही नियोजन पुण्यातून झाले नाही, असे सांगण्यात आले. हे अर्धसत्य असल्याचा दावा केला जात आहे. पास देण्याचे काम पुण्यातल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडे नव्हते; परंतु त्यासाठी स्थानिक काँग्रेस कार्यकारिणीनेच नावे पाठविली होती. त्यात गटबाजी झाल्याचा आरोप केला जात आहे. याच वादातून अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे सदस्य गोपाळ तिवारी यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या खासगी ‘टीम’ने काही दिवसांपूर्वीच पुण्याला भेट देऊन विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे ठिकाण आणि तेथील व्यवस्थेची पाहणी केली. या कार्यक्रमाला कोणत्या संस्थांमधले विद्यार्थी उपस्थित राहणार, याची माहिती घेतली. या नियोजनात स्थानिक पातळीवरील कोणत्याच काँग्रेस पदाधिकाºयाला सहभागी करून घेण्यात आले नव्हते. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्या भारती विद्यापीठातील आणि इतर काही शैैक्षणिक संकुलातील विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. दोन तासांच्या कार्यक्रमानंतर राहुल गांधी शुक्रवारी लगेच पुन्हा विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर येथे प्रचारसभेसाठी जाणार आहेत.