सुशिक्षितच बळी पडतात अधिक : बँकेतील पैसा सांभाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हॅलो मी बँकेतून बोलतोय, तुमचे क्रेडिट कार्ड बंद होणार आहे. ते सुरू ठेवण्याचे काम माझ्याकडे आहे. तुमच्या कार्डची माहिती सांगा, असे सांगितल्यावर ज्येष्ठ नागरिकांनी विश्वास ठेवून आपल्या कार्डची माहिती दिली. काही वेळातच त्याच्या बँक खात्यातून दीड लाख रुपये काढले गेले. पण ती गोष्ट त्याच्या लक्षातच आली नाही. काही दिवसांनी त्यांनी बँक पासबुक भरून आणल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
कोणालाही आपल्या बँक खात्याचा ओटीपी नंबर सांगू नका, असे बँका आणि सायबर पोलीस सांगत असतात. असे असतानाही असंख्य सुशिक्षितच या जाळ्यात अडकतात आणि आपला गोपनीय क्रमांक सांगून बसतात. त्यानंतर त्यांच्यावर पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. अशा असंख्या तक्रारी सायबर पोलिसांकडे दररोज येत असतात.
केवायसी अपडेट करायचे असल्याचे सांगून फसवणूक झाल्याच्या २०२० मध्ये ३३० तक्रारी आल्या होत्या. यावर्षी जून २१ पर्यंत २६५ तक्रारी आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा अशा तक्रारींमध्ये वाढ होत आहे.
सायबर चोरट्यांच्या या जाळ्यात सापडलेल्यांमध्ये प्रामुख्याने सेवानिवृत्त, ज्येष्ठ महिला यांचा सर्वाधिक समावेश होतो. त्याचबरोबर अनेक तरुणही सायबर चोरट्यांच्या या जाळ्यात फसताना दिसतात. नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी सायबर चोरटे वेगवेगळे फंडे काढत असल्याचे आढळून आले आहे.
कुरियरने आले होते पत्र
हडपसर येथील एका महिलेला तुमच्या बँकेचे कुरियरने पत्र आले होते. त्यात तुमच्या बँक खात्याचे केवायसी अपडेट करायची सूचना देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्यात केवायसी अपडेट करायला सांगून सोबत एक लिंक देण्यात आली होती. या महिलेने ती बँकेकडूनच आली असल्याचे समजून ती लिंक ओपन केली. त्यात सर्व माहिती भरुन पाठविली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून सर्व पैसे काढण्यात आले.
रविवारी बँकेचा आला फोन
बँका कोणालाही फोन करून त्यांच्या खात्याची माहिती विचारत नाही, असे वारंवार सांगितले जाते. एटीएममध्ये आपण पैसे काढायला गेलो तरी, बँकांकडून तेथे कोणालाही आपला पासवर्ड शेअर करू नका अशा सूचना येत असतात. त्याचबरोबर रविवारी बँका बंद असतात, हे आता सर्वांनाच माहिती आहे, असे असले तरी एक तरुण सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकून फसला. या तरुणाला रविवारी बँकेतून बोलत असल्याचे सांगणारा फोन आला. त्याने त्यावर विश्वास ठेवून आपल्या बँक खात्याची माहिती दिली. त्याबरोबर चोरट्यांनी काही वेळात त्याचे बँक खाते खाली केली. तेव्हा तो सायबर पोलिसांकडे तक्रार करायला आला. पोलिसांनी त्याला विचारले हे केव्हा घडले. तेव्हा त्याने रविवारी असे सांगितल्यावर पोलीस त्याच्याकडे पाहतच राहिले.
गेलेला पैसा परत मिळणे कठीण
तुमच्याकडून चुकून गोपनीय क्रमांक, ओटीपी दिला गेला असेल तर बँकेकडून फसवणूक झालेली रक्कम रीफंड केली जात नाही. अशा प्रकारच्या गुन्ह्यात विविध मर्चंट/वॉलेटमध्ये पैसे गेलेले असतात. सायबर चोरटे हे पैसे लगेच एका खात्यातून दुसर्या खात्यात पैसे हस्तांतरीत करून नंतर ते काढून घेतात. त्यामुळे हे पैसे मिळणे अवघड जाते.
पैसे खात्यातून काढले गेल्यावर लगेच सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यास पोलिसांकडून तातडीने संबंधित मर्चंट/वॉलेट अथवा बँकेच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून तुमचे पैसे गोठविण्यास सांगतात. जर सायबर चोरट्यांनी पैसे काढून घेतले नसतील तर ते गोठविले जातात.
केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक
२०२० - ३३०
जून २०२१ - २६५