रहाटणी : ज्या आईवडिलांनी आपल्याला जीवन दिले त्या आई-वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा मानावे़ खऱ्या आई-वडिलांची हाल अपेष्टा होत आहे़ त्यामुळेच राज्यांमध्ये नव्हे तर देशांमध्ये वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ हे कुठेतरी थांबवायचे असेल तर जन्मदात्या आई-वडिलांची सेवा करणे हेच काळाची गरज आहे, असे समाजप्रबोधनकार शारदा मुंडे यांनी रहाटणी येथे बळीराज ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त व्याख्यान देताना आपले मत मांडले़
या वेळी प्रबोधनकार शारदा मुंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी माजी सरपंच गोविंद तांबे, हभप अंकुश राजवाडे, नगरसेविका सविता खुळे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षा सुरेखा तापकीर, अध्यक्ष महादेव यादव, एम़ एस़ कांबळे, सामाजिक कार्यकर्ते नरेश खुळे यांच्यासह परिसरातील, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या, ‘‘जर संसारामध्ये सुख, समाधान, शांती हवी असेल तर आईवडिलांची सेवा करणे हे गरजेचे आहे़ आई-वडील किंवा त्यांचे प्रेम हे विकत मिळण्यासारखे नाही़ जर त्यांना आपलेसे करायचे असेल तर त्यांची सेवा करणे गरजेचे आहे़ एखाद्या मुलाला वाढविण्यासाठी आई-वडील किती हालअपेष्टा सहन करतात हे फक्त आणि फक्त त्यांनाच माहीत असते़ त्यामुळे उतरत्या वयामध्ये आई-वडिलांची सेवा करणे व मुलांनी उतरत्या वयामध्ये आई-वडिलांना आधार देणे हे मुलांचे कर्तव्य आहे़ मात्र काही मुलं आई-वडिलांचा धिक्कार करून त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात आणि इतरत्र सुख शोधतात़ मात्र सुख कुठेही मिळत न्नाही.