पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मांडण्यात आलेला पाच वर्षे मुदतवाढीचा ठराव बेकायदेशीर आहे. हा बेकायदेशीर ठराव मागे घ्यायला भाग पाडण्यासाठी सदस्यांनी सर्वसाधारण सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन पुणेकर नागरिक कृती समितीने परिषदेच्या अध्यक्षांसह आजीव सदस्यांना केले आहे.
“मुदतवाढीचा ठराव मसापच्या वैभवशाली परंपरेला न शोभणारा आहे. त्यामुळे अनेक वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या मसापच्या देदीप्यमान वारशाचे आणि सर्वसामान्य सभासदांच्या हितांचे आपण रक्षण करावे,” असे आवाहन कृती समितीने पत्राद्वारे केले आहे. मिहिर थत्ते, अनिल कुलकर्णी, सुनील महाजन, शैलेंद्र बोरकर, अनिकेत पाटील, डॉ.माधव पोतदार, क्षितिज पाटुकले आदी पन्नास जणांच्या यावर स्वाक्षऱ्या आहेत.
‘मसाप’ कार्यकारिणीच्या पाच वर्षे मुदतवाढीचा ठराव येत्या २८ जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता एस.एम. जोशी सभागृहात होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर चर्चेसाठी ठेवला जाणार आहे. या ठरावाला विरोध करण्यासाठी आजीव सभासदांनी सर्वसाधारण सभेला उपस्थित राहावे. कोणतीही कारणे न देता, त्वरित निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, लवकरात लवकर निवडणूक अधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करा, अशी मागणी कृती समितीने केली आहे.
चौकट
विरोधी मतदान करा
“पाच वर्षे मुदतवाढ घेणे साफ चुकीचे आहे. या विरोधात आम्ही मोहीम सुरू केली आहे. येत्या २८ जानेवारीच्या बैठकीत या ठरावाच्या विरोधी मतदान करण्याचे आवाहन आम्ही केले आहे. सुमारे ५० सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र कार्यकारिणी सदस्य, विश्वस्त आणि इतर सदस्यांना पाठविले आहे.”
-मिहिर थत्ते, निमंत्रक, पुणेकर नागरिक कृती समिती