पुणे : स्मार्ट सिटीतील सेवांसाठी सेवाशुल्क द्यावे लागेल, तसेच आवश्यक असेल तर करवाढही केली जाईल, असे संकेत स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिकेने स्थापन केलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीसीडीसी) या कंपनीचे नवनियुक्त अध्यक्ष तसेच राज्याच्या नगरविकास विभागाचे सचिव डॉ. नितीन करीर यांनी दिले. कंपनीकडून वाहतूक सुधारणा याच विषयाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे यांनी सांगितले.स्मार्ट सिटीत वाहतूक सुधारणा हा नागरिकांनी सुचवलेला विषय असून, त्यात बदल केला जाणार नाही. त्यात पादचारी सुरक्षा, रस्ते सुरक्षा असे अनेक विषय आहेत. जवाहरलाल नेहरू योजना व स्मार्ट सिटी योजना यात काही साम्य व फरकही आहे. त्या योजनेत पायाभूत सुविधांना महत्त्व होते. त्या सुविधा नसतील तर स्मार्ट सिटी योजनेत सहभागच घेता येणार नाही. केंद्र, राज्य व महापालिका यांच्या निधीतून ती योजना सुरू होती. स्मार्ट सिटीत यातून निधी मिळेलच; शिवाय अन्य मार्गांनीही निधी उभा करण्याची तरतूद आहे. काही कंपन्यांनी त्यासाठी तयारी दर्शवली असून त्यावर विचार करण्यात येईल, अशी माहिती करीर यांनी दिली.काही महिन्यांतच किमान १५ प्रकल्प कंपनीकडून सुरू करावेत असा प्रयत्न आहे. त्यात काही सुचना केल्या पण बदल सुचवलेले नाहीत. नवे अत्याधुनिक सिग्नल्स उभारणे, पादचारी सुरक्षेच्या उपाययोजना करणे, व्हेईकल हेल्थ मॉनिटरिंग सिस्टिम, सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष, २४ तास पाणीपुरवठा याचा त्यात समावेश आहे. गरज असेल त्यावेळी आपण मुंबईतून येथे येऊ, कंपनीचे कार्यालय महापालिकेत असेल किंवा अन्य ठिकाणी, त्याचा निर्णय संचालक घेतील असे करीर म्हणाले. (प्रतिनिधी)
करवाढीचे करीर यांचे संकेत
By admin | Published: June 01, 2016 2:12 AM