नीरा : नीरा (ता. पुरंदर) येथील गावठाण विस्तार करण्याच्या मागणीला गती मिळाली आहे. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत वाढीव गावठाण करण्याबाबत सर्व्हे करणे तसेच महादेव मंदिर घाटाच्या बांधकामाबाबत चर्चा झाली. या वेळी आवश्यक त्या पुढील प्रक्रियेला सुरुवात करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्याची माहिती नीरा-शिवतक्रार ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल चव्हाण तसेच भाजपाचे नीरा शहराध्यक्ष विजय शिंदे यांनी दिली.
यावेळी हवेली तालुक्यातील भिलारवाडी, मांगडेवाडी येथेही वाढीव गावठाण जाहीर करणे व सर्व्हे करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.या वेळी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, प्रांताधिकारी संजय असवले, जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार, पुरंदर व हवेलीचे तहसीलदार, जलसंपदा, बांधकाम, पुरातत्त्व या विभागांतील विविध प्रशासकीय अधिकारी हजर होते. ज्युबिलंट कंपनी, बाजारपेठ, दवाखाने, रेल्वे स्थानक तसेच नदीकाठचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने गेल्या दोन दशकांत नीरेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. येथील नीरा-शिवतक्रारचा भाग गावठाणात आहे; मात्र स. नं. २७, २८, २९, ३०, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३६, ३७, ३८, ३९, ४०, ४१, ५१, ५२, ५३, ५४, ५८, ५९, ६०, ६१ गावठाण हद्दीत नसल्याने ग्रामस्थ तसेच व्यापाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. व्यवसाय तसेच बँक कर्ज मिळत नसल्याने व्यापारवृद्धीला खीळ बसत असल्याने गावठाणवाढ करण्याची मागणी ग्रामपंचायत, ग्रामस्थ तसेच नीरा भाजपा शाखेकडून करण्यात आली होती. दरम्यान, १ आॅगस्ट २००३ व ८ फेब्रुवारी २०१० रोजी गावठाण हद्दवाढीचे प्रस्ताव पुरंदरच्या तहसील कार्यालयाला सादर करण्यात आले होते. मात्र, १५ वर्षांनंतही शासनाकडून गावठाणवाढीचा विषय गांभीर्याने घेतला गेला नाही. त्यानंतर ५ एप्रिल २०१७ तसेच १३ मे २०१७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने निवेदनाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना अधीनस्थ कार्यालयांना दिल्या होत्या. ग्रामपंचायतीकडून याविषयी पाठपुरावा सुरू असल्याचे सदस्य अनिल चव्हाण यांनी सांगितले.गुळुंचेच्या गावठाण विस्ताराबाबत जिल्हा परिषदेकडून पीएमआरडीएकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते; परंतु गुळुंचे पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे पीएमआरडीएकडून जिल्हा परिषदेला कळविण्यात आले.त्यामुळे येथील गावठाण विस्तार रखडला आहे. पुरंदर तालुक्यातील गावांचा समावेश पीएमआरडीएत झाल्यास अनेक गावांच्या हद्दवाढीचा प्रश्न सुटून विविध योजना राबविणे स्थानिक स्वराज्य संस्थांना शक्य होणार असल्याने पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात पुरंदरमधील गावांचा समावेश करण्याबाबत चर्चा करण्यात आली.