पुणे : मार्गशीर्ष व लग्नाचा हंगाम सुरू झाल्याने मार्केट यार्डातील भुसार बाजारात नारळाला जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून मागणी वाढली आहे. त्यात जुन्या नारळाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, आवक कमी झाली आहे. यामुळेजुन्या नारळाच्या दरात शेकडा २०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर, नव्या नारळाचा दर्जा खालावल्यामुळे गेल्या काही दिवसांत घटलेले दर स्थिर असून फेब्रुवारी अखेरपर्यंत हीच परिस्थिती कायम राहणार असल्याची माहिती दी पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष आणिनारळाचे व्यापारी दीपक बोरा यांनी दिली.मार्केट यार्ड येथील भुसार बाजारात आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूतून नारळाची आवक होत असते. गेल्या वर्षी या राज्यांमध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे उत्पादनही कमी घेण्यात आले. सध्या शहरातील मार्केट यार्डात दररोज ७ ते १० गाड्या नारळाची आवक होत आहे. याप्रकारे दर दिवशी साधारण दोन ते तीन लाख नारळ बाजारात दाखल होत आहेत. दरम्यान, मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने गेल्या काही वर्षांच्या तुलनेत नारळाच्या दरात दीड ते दोन पटींनी वाढ झाली आहे. यंदा नारळाच्या उत्पादन होणाºया क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने उत्पादनात वाढ होऊन फेब्रुवारी अखेरपर्यंत नारळाच्या आवकेत वाढ होऊन चांगल्या दर्जाचा माल उपलब्ध होईल असेही त्यांनी सांगितले.दिवाळीनंतर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या उपवासाला सुरुवात झाल्याने नारळाच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, नव्या नारळाच्या अपेक्षित दर्जाची आवक होत नसल्याने त्याच्या दरात घसरण झाली आहे. सध्या नारळाचे दर स्थिर असून हे दर फेब्रुवारीअखेरपर्यंत कायम राहतील. धार्मिक कार्यक्रमांमध्ये नारळाला विशेष महत्त्व असल्याने त्याला नेहमी मागणी राहते. उत्सवांच्या निमित्ताने पूजेपासून ते सत्कारापर्यंत आणि मिठाईपासून घरगुती वापरापर्यंत नारळाची आवश्यकता भासते. जवळपास चार प्रकारचे नारळ बाजारात उपलब्ध असतात. तमिळनाडूचा नवा नारळ हा धार्मिक विधीसाठी वापरण्यात येतो. हा नारळ आकाराने छोटा व मध्यम असतो. तर, आंध्रचा पालकोल तसेच मद्रास नारळास किराणा दुकानदारांकडून मोठी मागणी राहते. हा नारळ घराघरांत स्वयंपाकासाठी वापरला जातो. कर्नाटक नारळ आकाराने मोठा व जाड, खोबरे चवीला उत्तम असल्याने हॉटेल व्यावसायिक खानावळ, केटरिंग व्यवसायाकडून या नारळाला मोठी मागणी असते.
नारळाच्या दरात मोठी वाढ, हंगाम अंतिम टप्प्यात, फेब्रुवारी अखेरपर्यंत दरवाढ कायम राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 3:09 AM