पिंपरी : वल्लभनगर एसटी आगाराने आर्थिक वर्षात २५ कोटी ३३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. यासाठी आगारातील एसटी गाड्या ७७ लाख ६७ हजार किलोमीटर धावल्या. गतवर्षी ७८ लाख ३६ हजार किलोमीटरचा पल्ला गाठल्यानंतर २५ कोटी २६ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत कमी किलोमीटर गाड्या धावूनसुद्धा एसटी आगाराला सात लाख रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले आहे.मागील वर्षी २०१४-१५ या आर्थिक वर्षात पिंपरी-चिंचवड आगाराला २५ कोटी २६ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. यासाठी तब्बल ७८ लाख ३६ किलोमीटरच्या फेऱ्या एसटी गाड्यांनी पूर्ण केल्या होत्या. या वर्षी नियोजनबद्ध काम केल्याने व मार्गात बदल केल्याने कमी किलोमीटरमध्येच एसटीला जादा उत्पन्न मिळाले आहे. जेथे प्रवासी संख्या जास्त आहे, तसेच ज्या मार्गावरून जास्त अंतर पडत आहे, अशा मार्गांमध्ये बदल केल्यामुळे आगाराच्या उत्पन्नात भर पडली आहे.होळी, गणपतीला कोकणात जाण्यासाठी जादा गाड्यांचे नियोजन केले जाते. मूळचे कोकणस्थ, परंतु कामानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामुळे होळी व गणपती या सणांसाठी आगारातून कोकणातील विविध भागांत जाण्यासाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात येते. त्यामुळे मार्च महिन्यात व सप्टेंबर महिन्यात आगाराचे उत्पन्न जास्त होेते. मार्चमध्ये एक कोटी ९४ लाख व सप्टेंबरमध्ये दोन कोटी ४ लाख रुपयांचे उत्पन्न आगाराला मिळाले. याशिवाय दिवाळीच्या म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात दोन कोटी ५३ लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न आगाराने मिळविले. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचा काळ म्हणजे सुट्यांचा कालावधी. यामध्ये एप्रिल, मे व जून या उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आगाराला सहा कोटी ८२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तसेच उन्हाळी सुटीसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षी उत्पादन वाढेल.(प्रतिनिधी)या वर्षी नियोजनबद्ध काम केल्याने व मार्गात बदल केल्याने कमी किलोमीटरमध्येच एसटीला जादा उत्पन्न मिळाले आहे. जेथे प्रवासी संख्या जास्त आहे, तसेच ज्या मार्गावरून जास्त अंतर पडत आहे, अशा मार्गांमध्ये बदल केल्यामुळे आगाराच्या उत्पन्नात भर पडली आहे. गणपती, दिवाळी, होळी व उन्हाळी सुट्यांमध्ये आगाराने जादा उत्पन्न मिळविले आहे. यामुळे सरासरी वर्षभरात मिळालेल्या उत्पन्नात वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने २८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी २५.३३ लाख रुपयांचे उत्पन्न आगाराने मिळविले आहे.- अनिल भिसे, आगारप्रमुख,पिंपरी-चिंचवड
वल्लभनगर आगाराच्या उत्पन्नात सात लाखांनी वाढ
By admin | Published: April 13, 2016 3:30 AM