पुणे: महाराष्ट्रात एक एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात झाली. अत्यावश्यक सेवा वगळून व्यापार, उद्योगांना बंदी घालण्यात आली. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसण्यास सुरुवात झाली आहे. संचारबंदीचे निर्बंध अजून एक महिना कायम राहिल्यास जीएसडीपी (राज्य उत्पादन) १.५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. असा अंदाज मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रीकल्चर यांच्या उद्योग निरीक्षकांनी वर्तवला आहे.
संचारबंदीने दुकाने, व्यापार बंद झाले आहेत. त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. आठवड्याच्या निर्बंधाने राज्याला १० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे एमसीसीआय ने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे. त्यामध्ये ०.५ टक्के जीएसडीपीत घट झाली आहे. म्हणूनच संचारबंदी अजून एक महिना वाढवली तर १.५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या संचारबंदीत औद्योगिक क्षेत्रातील कामकाज एक महिन्यापेक्षा जास्त काळ थांबले होते. त्याचा परिणाम राज्याच्या महसूलावर झाला होता.
एमसीसीआयएच्या आकडेवारीनुसार बंद ठेवल्याने नोकरदार वर्गाचा रोजगारही थांबतो. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ लागतो. सद्यस्थितीत बहुतेक औद्योगिक कंपन्या रोजगाराचे प्रमाण कमी असूनही काम करत आहेत. " सध्याच्या निर्बंधाची स्थिती आणखी तीन आठवड्यापर्यंत राहिल्यास जीएसडीपीत १.५ टक्क्यांनी घट होईल असा अंदाज आहे. कोरोनाची दुसरी लाट सर्वांसाठी घातक आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी परिणाम कमी होईल. आतापर्यंत तरी काही कारखाने आपले उत्पादन चालू ठेवू शकले आहेत. परंतु हॉटेल, रेस्टॉरंट, व्यापार, आणि प्रवास अशा क्षेत्राला हा काळ त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.” असे एमसीसीआयचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी सांगितले आहे.