लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्पोर्ट्स फिल्ड मॅनेजमेंटतर्फे आयोजित दुसऱ्या एस. बालन करंडक अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत ओम भोसलेच्या नाबाद ६२ धावांच्या जोरावर जीएसटी अँड कस्टम संघाने सेंच्युरी क्रिकेट क्लब संघाचा ८६ धावांनी पराभव करत विजेतेपद संपादन केले.
मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात धावांचा पाऊस पडला. जीएसटी अँड कस्टम संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात ४ गडी गमावून १९९ धावांचा डोंगर उभा केला. संघाने सावध सुरूवात केली. तुषार श्रीवास्तव व रोहन मारवा या सलामीवीरांनी ५४ चेंडूंत ७५ धावांची भागिदारी करून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या ओम भोसलेने ३१ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकार ठोकले. धीरज फटांगरे यानेही २४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांची आतषबाजी केली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ५४ चेंडूंत १११ धावांची भागिदारी करत संघाला १९९ धावासंख्या उभी करून दिली.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सेंच्युरी क्रिकेट क्लबचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. यश नहार व ओंकार आखाडे यांच्या प्रतिकारानंतर संघाचा डाव १८.१ षटकात व ११३ धावांवर आटोपला. जीएसटी संघाच्या अक्षय करनेवर याने १९ धावा ४ गडी टिपत संघाचा विजय सोपा केला. विजेत्या जीएसटी अँड कस्टम संघाला ५१ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या सेंच्युरी क्रिकेट क्लब संघाला ४१ हजार रूपये व करंडक देण्यात आला. तिसऱ्या क्रमांकावरील द गेम चेंजर्स संघाला ३१ हजार रूपये आणि करंडक असे पारितोषिक देण्यात आले. पारितोषिक वितरण लिजेंडस् स्पोर्टस् क्लबचे संचालक संदीप कोद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पोर्ट्स फिल्ड मॅनेजमेंटचे सनी मारवाडी, संतोष शहा, सोहम आगाशे आदी यावेळी उपस्थित होते. अभय जाजू यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
मालिकेतील सर्वोत्कृष्ट
खेळाडू - नौशाद शेख (१५३ धावा व ७ बळी)
फलंदाजाचा - अर्थव काळे (२१० धावा)
गोलंदाज - अक्षय करनेवर (१० बळी)
क्षेत्ररक्षक - पवन शहा
स्पर्धेचा सविस्तर निकाल : अंतिम फेरी :
जीएसटी अँड कस्टम संघ : २० षटकात ४ गडी बाद १९९ धावा, ओम भोसले नाबाद ६२, तुषार श्रीवास्तव ४७, धीरज फटांगरे ४४, रोहन मारवा ३०, प्रथमेश पाटील २-३८; वि.वि. सेंच्युरी क्रिकेट क्लब : १८.१ षटकात १० गडी बाद ११३ धावा, यश नहार ३६, ओंकार आखाडे १६, अक्षय करनेवर ४-१९, अक्षय वाईकर २-२२; सामनावीर : ओम भोसले
तिसऱ्या स्थानासाठी : द गेम चेंजर्स : २० षटकात १० गडी बाद १५७ धावा, नौशाद शेख ३८, अतिफ सय्यद ३४, अतुल वीटकर २२, अॅलन रॉड्रीक्स् ५-२६, सचिन भोसले २-२३ वि.वि. किंग्ज् स्पोर्टस् क्लब : २० षटकात ९ गडी बाद १४५ धावा, अर्थव काळे ४०, अजित गव्हाणे २२, मिझान सय्यद ३२, नौशाद शेख ३-१९, प्रज्वल गुंड २-३२; सामनावीर : नौशाद शेख.