सुपे : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बैलपोळा सणासाठी बाजारपेठेत जय्यत तयार करण्यात आली आहे. कातडी वाणात लेझरपट्टा, चमडापट्टा, घागरमाळ, मोरकी व पितळीवाणात घाटी, घुंगरे, तोडे, शेंबी, पैंजण तसेच बोरकडी आदी वस्तू व्यापा-यांनी विक्रीसाठी ठेवल्या आहेत.या वेळी शासनाने जीएसटी सुरू केल्याने सुमारे १२ ते १८ टक्के बाजारभावात वाढ झाल्याची माहिती श्रीरामपूर येथील मधुकर कासार, बुलढाण्याचे समाधान सुट्टे आणि जामखेडचे सत्तार आत्तार यांनी दिली.>बैलपोळ्याच्या बाजारात खरेदी-विक्रीवर परिणामबैलपोळ्याचा सण आठवडाभर पुढे असल्याने सुपे (ता. बारामती) येथे बुधवारी भरलेल्या बैलपोळ्याच्या बाजारात खरेदी-विक्रीवर परिणाम दिसून आला. तसेच, बैलांची संख्या दिवसेंदिवस घटत चालल्याने उलाढालीवर परिणाम झाल्याची माहिती व्यापा-यांनी दिली. येथील बाजारात शिर्डी, जामखेड, राहता, पंढरपूर, बार्शी, श्रीरामपूर, घोडेगाव, बीड आदी ठिकाणांहून व्यापारी आले होते.>बाजारात घुंगरूमाळ, दृष्टमाळ, कवडीमाळ, बकरीपट्टा, सातारीपट्टा, चांगळीपट्टा, वेसन मोरकी आदी तयार वस्तू व्यापा-यांनी विक्रीसाठी ठेवल्या होत्या. तर बैल सजावटीतील लोकरीचे सर, गोंडे, शेंब्या, रेशीम कंडा, माथाटी, शेंदोरी, बासिंग तसेच मणिमाळमधील बकरीपट्टा, कवडीमाळ आणि घोगरमाळ आदींना चांगली मागणी होती. मागील काही वर्षांपासून शेतीत सुधारणा झाल्या आहेत. सध्या बहुतांश शेतकरी यांत्रिकीकरणाच्या साहाय्याने शेती करीत असल्याने बैलांच्या संख्येत मोठी घट झाल्याने उलाढालीवर परिणाम होत असल्याची माहिती व्यापा-यांनी दिली.
जीएसटीमुळे बैलपोळा साहित्य बाजारभावात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 11:44 PM