पुणे : मुठा नदीला आलेल्या पुरामुळे पुण्यातला भिडे पूल पाण्याखाली गेला हाेता. गेला आठवडाभर शहरात पावसाचा जाेर असल्याने हा पूल पाण्याखालीच हाेता. सध्या मुठा नदीतील पाणी ओसरले आहे. पुराच्या पाण्यामुळे पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी या पुलावरुन चालणे धाेकादायक झाले आहे.
पुण्यातील मध्यवर्ती भागात असणारा भिडे पूल पुरामुळे पाण्याखाली गेला हाेता. दरवर्षी हा पूल पाण्याखाली जाताे. यंदा मात्र आठवड्याहून अधिक काळ हा पुल पाण्यात हाेता. पाण्याचा वेग आणि जलपर्णी यांमुळे भिडे पुलाचे संरक्षक वाहून गेले आहेत. सध्या या पुलावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. संरक्षक कठडे नसल्याने एखादी व्यक्ती पाण्यात पडून अपघात हाेण्याची शक्यता आहे. पुराच्या दाेन्ही बाजूचे संरक्षक कठडे तुटले आहेत.
दरम्यान मुठा नदीला आलेला पूर आता ओसरला असून जनजीवन पुर्वपदावर आले आहे. ज्या भागांमध्ये पाणी शिरले हाेते, तेथील नागरिक देखील आता पुन्हा एकदा आपले घर उभारत आहेत.