पुणे : शुल्कवाढीबाबत सातत्याने तक्रारी करूनही शाळांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने पालक आक्रमक झाले आहेत. संंबंधित शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत पालकांनी सोमवारी विभागीय शिक्षण उपसंचालकांना घेराव घातला. रात्री नऊ वाजेपर्यंत कार्यालयात हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर पालकांनी आपला मोर्चा थेट बंडगार्डन पोलीस ठाण्यात वळविला. शहरासह उपनगरांतील विविध शाळांनी शुल्कवाढ केल्यानंतर, त्याला पालकांनी सातत्याने विरोध केला आहे. याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकाऱ्यांकडेही तक्रारी करण्यात आल्या आहे; मात्र शाळांना मान्यता रद्द करण्याच्या नोटिसा देण्याव्यतिरिक्त शिक्षण विभागाकडून अद्याप कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. कार्यालयाबाहेरही यापूर्वी अनेकदा आंदोलन करण्यात आले आहे. तरीही कारवाई होत नसल्याने सोमवारी १८ ते २० शाळांशी संबंधित पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर आंदोलन केले. या वेळी पालकांनी शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांच्या कार्यालयात शिरून त्यांना घेराव घातला. या वेळी पोलिसांनीही मध्यस्थिती करण्याचा प्रयत्न केला; पण पालक आक्रमक झाल्याने त्यांनी शाळांना कायदेशीर नोटीस बजावण्याची मागणी लावून धरली. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची घोषणाबाजी करण्यात आली.दुपारी चारच्या सुमारास सुरू झालेला हा गोंधळ रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होता. शुल्क नियमन, शुल्क नियंत्रण कायदे धाब्यावर बसवत शाळांनी शुल्कवाढ केली असल्याचे पुराव्यानिशी दाखवूनही शिक्षण विभाग सातत्याने या कायद्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पालकांनी सांगितले. नोटीस देऊनही शाळा मागे हटत नसल्याने त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्याची मागणी पालक करीत होते. पण रात्री उशिरापर्यंत टेमकर यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर सर्व पालक बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. रात्री उशिरापर्यंत पालक पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. पॉपसॉम संघटनेच्या अनुभा सहाय म्हणाल्या की, पाच वर्षांपासून सातत्याने काही शाळांबाबत तक्रार करत आहोत. याबाबत सोमवारी आढावा बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण अधिकारी न आल्याने पालक संतप्त झाले.
शाळांच्या शुल्कवाढीविरुद्ध पालक आक्रमक
By admin | Published: April 25, 2017 4:25 AM