पुणे पोर्शे अपघात प्रकरणानंतर पालकमंत्री अजित पवार अन् पोलिस आयुक्तांची पहिल्यांदाच भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 11:05 AM2024-05-31T11:05:18+5:302024-05-31T11:07:26+5:30
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दोन दिवसांपूर्वी पवार यांच्यावर अपघाताच्या अनुषंगाने गंभीर आरोप केले होते....
पुणे :पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी (दि. ३०) सकाळी सातच्या सुमारास पालकमंत्री अजित पवार यांची त्यांच्या जिजाई बंगल्यावर भेट घेतली. या वेळी अजित पवार यांनी अमितेश कुमार यांच्याकडून कल्याणीनगर अपघात प्रकरणाची माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र ही भेट शहरातील वाहतुकीच्या अनुषंगाने असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दोन दिवसांपूर्वी पवार यांच्यावर अपघाताच्या अनुषंगाने गंभीर आरोप केले होते.
अजित पवार यांनी अपघाताच्या बाबतीत आतापर्यंत थेट भाष्य करण्याचे टाळले होते. अपघाताबाबत सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतर तपासाची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पोलिस आयुक्तालयात येऊन प्रकरणाची माहिती घेतली होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. ते दररोज या प्रकरणाच्या तपासाचा अहवाल मागवून घेतात. या अपघात प्रकरणानंतर पहिल्यांदाच पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पालकमंत्री यांची गुरुवारी भेट झाली. या भेटीदरम्यान अपघात प्रकरणाची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र पवारांनी नेमकी कोणती माहिती घेतली हे मात्र समजू शकले नाही. अपघातानंतर ‘बाळा’ला बाल न्यायमंडळाकडून मिळालेला जामीन स्थानिक राजकीय पुढाऱ्यावर झालेले आरोप यामुळे नागरिकांच्या मनामध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता.
आमदार टिंगरेंकडून डॉ. तावरेंची शिफारस व्हाया अजित पवार? भावाला केले सातारा जि. प. सदस्य
पोलिसांना मोठ्या प्रमाणात टीकेचे धनी व्हावे लागले. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी या अपघात प्रकरणांशी संबंधितांवर गुन्हे दाखल करून धरपकड सुरू केली आहे. त्यातच ससून रुग्णालयात मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने आता ससून पुन्हा चर्चेत आले आहे. या रुग्णालयातील वरिष्ठांंच्या गळ्याभोवती या प्रकरणाचा फास आवळत चालला असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. यामुळेच पवार यांनी पोलिस आयुक्तांना भेटीला बोलावल्याची चर्चा सुुरू आहे.