पालकमंत्री अजित पवार राजीनामा द्या; पुण्यात शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन
By निलेश राऊत | Published: June 25, 2024 03:10 PM2024-06-25T15:10:58+5:302024-06-25T15:11:26+5:30
पुणे शहरात अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाला असून, गृहखात्याला याचा थांगपत्ता नाही ही बाब संशयाला वाव देणारी, आंदोलकांचा आरोप
पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाला असून, गृहखात्याला याचा थांगपत्ता नाही ही बाब संशयाला वाव देणारी आहे. असा आरोप करीत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मंगळवारी राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री अजित पवार राजीनामा द्या अशा घोषणाही देण्यात आल्या.
ज्ञानेश्वर पादुका चौक, फर्ग्युसन कॉलेज रस्ता येथे पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जगताप यांनी, शहरात छोट्या मोठ्या हॉटेल्स, बारमध्ये खुलेआम अमली पदार्थ मिळतात, शहरात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढतच असून भर दिवसा हातात कोयता घेऊन हिंडणारे गुंड अनेक ठिकाणी दिसत आहेत. मात्र कायद्याचा धाक गुन्हेगारांना राहिलेला नाही. ड्रग्स माफियांना, गुन्हेगारांना अधिकाऱ्यांचे, मंत्र्यांचे अभय आहे ही बाब सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी मात्र केवळ लोकसभा निवडणुकीच्या चिंतनात, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आणि विधानसभेच्या जागा वाटपात व्यस्त असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान राज्य सरकारकडून येत्या काही दिवसात ठोस उपाययोजना न झाल्यास शहरात एकच वेळी अनेक ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनाय उदय महाले, राजीव साने, दिलशाद शेख, किशोर कांबळे, अजिंक्य पालकर, स्वप्निल जोशी, जयदीप देवकुळे, राजश्री पाटील, पोपट खेडेकर, स्वाती चिटणीस, सुषमा सातपुते, सुनील पडवळ, नितीन कदम, वंदना मोडक, गणेश नलावडे, स्वाती पोकळे, काका चव्हाण उपस्थित होते. आंदोलनात पालकमंत्री उत्तर द्या, गृहमंत्री उत्तर द्या, ५० खोके एकदम ओके, ५० खोके कोयता गँग ओके, ५० खोके ड्रग माफिया ओके, गृहमंत्री राजीनामा द्या, उत्पादन शुल्क मंत्री राजीनामा द्या, मोदींसाठी मुरलीधर पुण्याची सुरक्षा वाऱ्यावर अशा घोषणा देण्यात आल्या.