पुणे : समाविष्ट गावातील मिळकतधारकांना जास्त कर लावण्यात आला आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावातील कर आकारणी पिंपरी चिंचवड प्रमाणे करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर करू असे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले होते. आता आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी त्यांनी दिलेला शब्द पाळावा, त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे असे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सांगितले.
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पाणी, कचरा, रस्ते, वाहतूक कोंडी या विषयावर सुप्रिया सुळे यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दालनात बैठक घेतली. त्यावेळी तेथील नागरिकांनी आयुक्तांसमोर त्यांच्या समस्या मांडल्या. त्यानंतर सुळे यांनी पत्रकारांशी बोलत होत्या. माजी नगरसेवक विशाल तांबे, सचिन दोडके यावेळी उपस्थित होते. सुप्रिया सुळे म्हणाल्या, समाविष्ट गावातील मिळकतधारकांना जास्त कर लावण्यात आला आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावातील कर आकारणी पिंपरी चिंचवड प्रमाणे करण्याचा निर्णय झाला आहे. पण त्याची अजून अंमलबजावणी सुरु झालेली नाही. त्यासाठी नगरविकास विभागाकडेही पाठपुरावा करणार आहे. पालकमंत्र्यांनीही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. म्हाळुंगे, रावेत भागात ४० मजली इमारती उभ्या राहत आहेत. या गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही. असे असताना प्रचंड वेगात बांधकामे होत आहेत. त्यामुळे पुण्याचे पाणी, कचरा, रस्ते यांचे तज्ज्ञांकडून ऑडिट होणे आवश्यक आहे. अन्यथा परिस्थिती गंभीर होणार असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
समन्वय अभावी कात्रज कोंढवा रस्त्याचे काम रखडले
‘‘महापालिकेत नगरसेवक नसल्याने नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी कोणीच नाही, त्यामुळे समस्या गंभीर होत आहेत. या गावातील समस्यांवर मी दर महिन्याला बैठक घेऊन कामांचा पाठपुरावा करत आहे. कात्रज कोंढवा रस्ताच्या कामात महापालिका, राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वय नसल्याने हे काम रखडले आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे त्याचा पाठपुरावा सुरु आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. *