पालकमंत्री कोण, महापौर कोण आणि मुख्यमंत्री कोण याचा विचार व्हावा : प्रवीण गायकवाड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 03:40 PM2019-03-31T15:40:55+5:302019-03-31T15:49:58+5:30
कॉँग्रेसचा प्रचाराचा नारळ फुटण्याच्या अगोदरच गायकवाड यांनी लाल महाल येथे समविचारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
पुणे : पुण्यातील पालक मंत्री कोण आहे, महापौर कोण आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत याचा विचार व्हावा असे सुचक वक्तव्य करत पुण्यातील कॉँग्रेसकडून इच्छुक उमेदवार संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. कॉँग्रेसचा प्रचाराचा नारळ फुटण्याच्या अगोदरच गायकवाड यांनी लाल महाल येथे समविचारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
रविवारी सकाळपासूनच कार्यकर्त्यांना विविध माध्यमांद्वारे संपर्क साधून दुपारी दोन वाजता लाल महाल येथे बोलाविण्यात आले होते. ‘आता पुण्याचा कारभार शनिवारवाड्यातून नाही तर लाल महालातून चालणार. बहुजनांचा आवाज लोकसभेत जाणार‘ अशा आशयाचे संदेश पाठविण्यात आले. माध्यमांच्या प्रतिनिधींना मात्र सभेला परवानगी नाकारल्याची माहिती देण्यात आली होती.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गायकवाड लाल महाल येथे आले. ज्या टप्यावर आपण चर्चा करतोय, ज्या टप्यावर ही चर्चा आहे. अद्याप आपली उमेदवारी निश्चित झालेली नाही असे सांगुन गायकवाड म्हणाले, ‘‘ या देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या निमित्ताने राजकीय व्यवस्था निर्माण झाली आहे. हुकूमशाही प्रवृत्तीचे लोक काम करत आहेत. संघ परिवाराचा प्रवाह वाढला आहे. पुण्यातील महापौर कोण, पालक मंत्री कोण, राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत याचा विचार करायला हवा. केवळ प्रबोधनाने आपल्याला त्यांना हटविता येणार नाही. म्हणनू जस्टीस पी. बी. सावंत यांच्यासारख्या माझ्या मार्गदर्शकांनी मला सांगितले की मोदींची ताकद सत्तेतून वाढलेली आहे. त्यामुळे मोदींना सत्तेतून घालविणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाला, लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. माझ्या उमेदवारीच्या प्रश्नापेक्षा हा धोका महत्वाचा आहे. त्याविरोधात आपण लढले पाहिजे. पुढील पाच वर्षानंतर पुन्हा निवडणुका होतील की नाही ही भीती आहे. ‘‘
गायकवाड म्हणाले, ‘‘कॉँग्रेस हा पुरोगामी, बहुजन समाजाचा पक्ष आहे. सगळ्या विचारधारांना सामावून घेणारा पक्ष आहे. अशा पक्षामध्ये जात असताना तुमच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. गेल्या एक महिन्यामध्ये कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि आपल्या बहुजन समाज पक्षाच्या लोकांशी ओळखी करून घेत होतो.‘‘
जिजाऊंना वंदन करतानाचे फोटो व्हायरल करा
प्रवीण गायकवाड यांनी भाषण संपल्यावर लाल महाल येथील जिजाऊंच्या पुतळ्याला वंदन केले. यापूर्वी सर्व कार्यकर्त्यांना मोबाईलवर वंदन काढतानाचे फोटो काढण्याचे आवाहन केले. हे फोटो तुम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे व्हायरल करा असेही ते म्हणाले. सोशल मीडिया जबाबदारीने वापरा. आपले विरोधक आपल्या विरोधात पोस्ट टाकतील. त्यामुळे आपल्याला नुकसान सहन करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
.......
उमेदवारी कोणालाही मिळाली तरी बहुजन चळवळीचे कार्यकर्ते कॉँग्रेसे काम करणार : गायकवाड
लाल महाल येथील सभेनंतर ‘लोकमत’शी बोलताना प्रवीण गायकवाड म्हणाले, ‘‘ बहुजन चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. उमेदवारी कोणालाही मिळाली तरी कॉँग्रेसला निवडून आणण्याचे आवाहन केले. नरेंद्र मोदी, संघ परिवार यांच्यापासून देशाला धोका आहे. कॉँग्रेस पक्षच समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता मानणारा पक्ष आहे.