पुणे : पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज थेट पोलीस आयुक्तांनाच पुणे शहरातील तब्बल २७ अवैध धंद्यांची ठिकाणांसह यादी देऊन चकित केले. येत्या १० दिवसांत यावर कारवाई करा; अन्यथा मीच आंदोलन करीन, असा इशाराही त्यांनी आयुक्तांना दिला.बापट यांनीच ही माहिती दिली. शहरातील अनेक ठिकाणी अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे. स्थानिक पोलिसांकडून हे धंदे चालवणाऱ्यांना संरक्षण द्यावे लागते. त्यामुळे नागरिकांना पोलिसांची खात्री वाटत नाही. त्यातून तक्रारी होत नाहीत व गुंडाचे अधिक फावते. या गुंडगिरीचा त्रास सहन होत नसल्याने नागरिकांनी आपल्याकडे तक्रारी केल्या, असे बापट म्हणाले. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊनच ही यादी तयार केली असल्याचे त्यांनी सांंगितले. अशा लोकांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत, असे ते म्हणाले.बापट यांच्या या बैठकीला पोलीस आयुक्त के. के. पाठक तसेच सर्व उपायुक्त व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला शहरातील कायदा-सुव्यवस्थेची माहिती घेतल्यानंतर त्यांनी बरोबर आणलेली अवैध धंद्यांची यादी थेट आयुक्तांनाच दिली. कोणाच्या संरक्षणातून हे धंदे चालतात याच्याशी किंवा ते कोण चालवतात याच्याशीही मला देणेघेणे नाही. येत्या १० दिवसांत यावर कारवाई व्हायला हवी; अन्यथा मीच तुमच्या विरोधात कार्यकर्त्यांसह आंदोलन करीन, असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांचा आंदोलनाचा इशारा
By admin | Published: November 27, 2015 1:46 AM