लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : येथील विद्या प्रतिष्ठानच्या विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर शाळेच्या फीवाढीच्या विरोधात आज पालकांनी पंचायत समितीवर मोर्चा काढला. कोणतीही पूर्व सूचना न देता केलेली फी वाढ रद्द करावी, अशी मागणी केली. यावेळी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पालकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. शाळेने केलेल्या फी वाढीच्या संदर्भात माहिती मागविण्यात येईल, असे सांगितले. या शाळेने इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गाची फी वाढ केली आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेची ही शाळा आहे. मागील आठवड्यात संस्थेचे विश्वस्त, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील पालकांनी फी वाढ रद्द करण्याचे निवेदन दिले होते. आज जवळपास अडीचशे पालकांनी पंचायत समितीमध्ये जाऊन गटविकास अधिकारी प्रमोद काळे, गटशिक्षणाधिकारी किशोर पवार यांना निवेदन दिले. त्यानंतर पालकांनी फी वाढीच्या संदर्भात म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी केली. त्यापूर्वी फी वाढीला विरोध करणाऱ्या पालकांची मीटिंग संस्था व्यवस्थापन आणि शाळेने आज आयोजित केली होती. या बैठकीत व्यवस्थापनाकडून पालकांना फी वाढीच्या संदर्भात उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली. फी वाढ ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे, असे पालकांनी सांगितले. त्यानंतर उपस्थित विश्वस्तांनी मागण्यांच्या संदर्भात ठाम प्रतिसाद दिला नाही.
शुल्कवाढीविरोधात पालकांचा बारामतीत मोर्चा
By admin | Published: June 28, 2017 3:59 AM