लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, आज (दि. १३ एप्रिल)असलेला गुढीपाडवा सण व दि. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. दोन्हीही साधेपणाने व नागरिकांनी एकत्र न येता साजरी करावेत, असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे़ तसेच या दोन्हीही दिवशी पालखी, दिंडी, प्रभातफेरी, बाईक रॅली व मिरवणुका काढू नयेत, याचबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असेही महापालिकेने कळविले आहे़
याबाबतचे आदेश पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आहेत़ यामध्ये १३ व १४ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजण्यापूर्वी गुढीपाडवा व डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्याबाबतचे निर्बंध लादण्यात आले आहेत़ तसेच डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अथवा पुतळ्याला फुलांचा हार अर्पण करण्याचा कार्यक्रम ५ व्यक्तींच्या उपस्थितीत व राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसारच साजरा करावा, असेही नमूद केले आहे़
याचबरोबर जयंतीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये़ तथा कार्यक्रमांसाठी केबल नेटवर्क अथवा आॅनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी़ वरील आदेशाचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्या २००५ नुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे़
----------------------------------