पुणे: दोन दिवसाच्या विकेंड लॉकडाऊन नंतर पुण्यातील मार्केट यार्डमध्ये आज सकाळी गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले आहे. यावेळी फिजिकल डिस्टन्स विसरून मालाची खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडालेली बघायला मिळाली.
पुणे शहर आणि जिल्हामध्ये सध्या देशातील सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे एकीकडे लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे नागरिक आणि व्यापारी कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळताना दिसत नाहीयेत. मार्केटयार्ड मधली गर्दी प्रचंड बघून प्रशासनही हतबल झालेले दिसून आले. पुणे शहरातच नाही तर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या गतीने वाढत आहे.
जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मार्केटयार्डमध्ये माल विक्रीस येत असतात. त्याच वेळी शहरातील व्यापारी लहान मोठे विक्रेते आणि व्यापारी खरेदीसाठी जात असतात. त्यांच्याकडून नागरिक भाज्या, फळे, फुलं खरेदी करतात. त्यामुळे कोरोना प्रसार अधिक वाढण्याची सुद्धा भीती आहे. मात्र तरीही मास्क तोंड आणि नाकावरून घसरलेले, फिजिकल डिसन्स नाही, सॅनिटायझरचा अत्यल्प वापर इथे दिसून आला.
त्यातच उद्या गुढीपाडवा असल्याने ताज्या भाज्या, फळे आणि फुलांना मागणी असणार आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर बाजारात मोठी लगबग दिसून आली आणि त्याचाच परिणाम म्हणजे झालेली ही गर्दी. आता तरी बाजार समिती प्रशासन शहाणे होऊन काही प्रतिबंधात्मक निर्णय घेणार का हेच बघावे लागणार आहे. किमान एका गाळ्यावर ठराविक ग्राहकसंख्येचे बंधन, मास्क लावणे आवश्यक, आतमध्ये ठराविक संख्येत प्रवेश अशा नियमांचा अवलंब करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा ठिकाणी झालेली गर्दी ही कोरोना वाढीस कारणीभूत ठरू शकेल यात शंका नाही.