पुणे : भारतातील हॉटेल उद्योगामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कारण, ‘अतिथी देवो भव’ हा येथील हॉटेल संस्कृतीचा गाभा आहे. विविधतेत एकता हे सूत्र या व्यवसायातही पाहायला मिळते’, अशा शब्दांत पुण्यातील ‘द वेस्टिन’चे महाव्यवस्थापक नासीर शेख यांनी हॉटेल व्यवसायाचे चित्र उलगडले.
लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांची शेख यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी विविध विषयांसह ‘लोकमत’च्या महाराष्ट्र आणि पुण्यातील यशदायी वाटचालीबाबत चर्चा झाली. शेख म्हणाले, ‘जीएसटी लागू करण्याचा निर्णय हॉटेल व्यवसायासाठी सकारात्मक ठरला. जगभरात प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. उत्पादन, बँकिंग, आयटी क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्या पुण्यामध्ये येत असल्याने हॉटेल व्यवसायाला फायदा होतो आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आदरातिथ्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हॉटेलमध्ये ग्राहकांना मनापासून सोयीसुविधा पुरवल्या जातात. केवळ आलिशान इमारती ही हॉटेलची ओळख नसून तेथील आदरातिथ्य, ग्राहकांना सकारात्मक प्रतिसाद या बाबींना या व्यवसायात महत्त्व आहे. शेख म्हणाले, ‘‘पूर्वी आलिशान हॉटेलमध्ये जाणे हे केवळ उच्चभ्रू वर्गाला परवडणारे होते. मात्र, आता जीवनमान उंचावल्याने पंचतारांकित हॉटेल्स सामान्यांच्या आवाक्यात आली आहेत. हॉटेल्सनीही धोरणांमध्ये अनेक बदल केले आहेत. ‘बजेट टू लक्झरी’ हे सूत्र अवलंबले जात आहे. खास प्रसंग हॉटेलमध्ये जाऊन साजरे करण्याची संधी मिळते.’’हॉटेल व्यवसायात विविधतेत एकताहॉटेल व्यवसायिक, कर्मचारी ‘विविधतेत एकता’ या सूत्रावर विश्वास ठेवतात. हॉटेलमधील अधिकारी, कर्मचारी तसेच ग्राहक विविध प्रांतिक, भाषिक पार्श्वभूमीचे असतात. तरीही, संतुलित संस्कृती पाहायला मिळत असल्याने कोणताही भेदभाव केला जात नाही. हॉटेलमधील विविध पदांवर नेमणूक करताना कौशल्य, मेहनत, चिकाटी, विनय या गुणांचीच पारख केली जाते, असेही नासीर शेख यांनी अधोरेखित केले.