लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून शेतकऱ्यांसाठी शेतमाल निर्यात मार्गदर्शन केंद्र सुरू होत आहे. राज्याचे शेतमाल निर्यातीचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी हे केंद्र काम करणार आहे.
स्वातंत्र्यदिनी ही सर्व केंद्र सुरू होतील. जिल्हा कृषी कार्यालयात केंद्र असेल. तिथे निर्यातीमधील माहितगार अधिकारी नियुक्त असेल. निर्यातक्षम माल तयार करण्यापासून परदेशी बाजारपेठेत माल कसा पाठवायचा, सौदा कसा करायचा याची सर्व माहिती या केंद्रांमधून शेतकऱ्यांना दिली जाईल.
केंद्र सरकारने सन २०१८ मध्ये निर्यात धोरण तयार केले. त्यापाठोपाठ महाराष्ट्रानेही स्वतंत्र निर्यातकक्ष सुरू केला.
एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कोरोना काळात भारतामधून परदेशात ५८ हजार ७६ कोटी रुपयांच्या फळफळावळ व भाजीपाल्याची निर्यात झाली. त्यात महाराष्ट्राचा वाटा १३ हजार ८७७ कोटी रुपयांचा आहे. यामध्ये द्राक्ष आणि आंबा निर्यातीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. आता सर्वच शेतीमालाला परदेशी बाजारपेठ मिळावी यासाठी राज्याने स्वतंत्र धोरण तयार केले आहे. ग्रामीण भागात याची परिपूर्ण माहिती व्हावी या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यात अशी मार्गदर्शक केंद्र सुरू करण्यात येत आहेत.
केंद्र सरकारने देशातील शेतीमाल परदेशात पाठवण्यासाठी स्वतंत्र संगणकीय यंत्रणा तयार केली आहे. त्याचा वापर आतापर्यंत महाराष्ट्रानेच सर्वाधिक केला आहे. आजमितीस राज्यातील ८० हजार शेतकरी राज्याच्या कृषी विभागाने या यंत्रणेला जोडले आहेत. आता ही यंत्रणा थेट जिल्हास्तरावर आणून शेतमाल निर्यातीमध्ये देशात राज्याला आघाडीवर आणण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे.