पुणे : तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण घेत देशापुढील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) १३३ व्या तुकडीचा शानदार शिस्तबद्ध दीक्षांत संचलन सोहळा गुरूवारी पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. कॅडेट कॅप्टन अर्जून ठाकूर याने या संचलनाचे नेतृत्त्व केले.किर्गिझस्थान रिपब्लिकच्या लष्कराचे चीफ आॅफ आर्मी स्टाफ मेजर जनरल राइमबरदी दुइशनबीएव्ह या संचलाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी लष्कराच्या दक्षिण कमांडचे लेफ्टनंट जनरल पी.एम. हारीस, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमाडंन्ट एयर मार्शल जसजीत सिंग क्लेर, प्रबोधनीचे उपप्रमुख रिअर अॅडमिरल एस. के. ग्रेवाल, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्ला, प्राध्यापक, प्रशिक्षक तसेच तिन्ही सेना दलातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. विशेष निमंत्रित अभिनेते नाना पाटेकर सोहळ्याचे आकर्षण बनले होते.या वेळी मेजर जनरल राइमबरदी दुइशनबीएव्ह आणि एयर मार्शल जसजीत सिंग क्लेर यांनी संचलनाची पाहणी करून विद्यार्थ्यांची मानवंदना स्वीकारली. यानंतर प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांच्या बँड पथकाच्या शिस्त आणि तालबद्ध वादनावर कॅडेट्सनी मार्च केले. कॅडेट कॅप्टन अर्जून ठाकूर याने तिन्ही वर्षात केलेल्या कामगिरीबद्दल त्याला राष्ट्रपती सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले. डिव्हीजनल कॅडेट कॅप्टन राहुल बिष्ट याला रौप्य पदक, तर बटालियन कॅडेट कॅप्टन शशांक शेखर याला कांस्य पदकाने सन्मानित करण्यात आले. चीफ आॅफ स्टाफ बॅनरचा मानकरी ‘एन’ स्कॉडर्न ठरली. संचलनात एकूण २५० कॅडेटनी सहभाग घेतला. यातील १५२ छात्र लष्कराचे, २७ छात्र नौदलाचे आणि १७ छात्र हवाईदलातील होते.चिता, सुखोई, मिराज विमानांची सलामीसंचलन सुरू असताना प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यासाठी लष्कराच्या चिता हेलिकॉप्टरद्वारे सलामी देण्यात आली. हवाईदलाच्या तीन सुखोई आणि मिराज विमानांनी विद्यार्थ्यांना सलामी दिली.‘सूर्यकिरण’ची प्रात्यक्षिके डोळे दिपवणारीएनडीएच्या १३३व्या दीक्षांत सोहळ्याच्या निमित्ताने सूर्यकिरण फॉरमेशन एरोबॅटिक टीमने सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. कसरतींची मालिका सादर होत असताना उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकत होता. एकूण ९ विमानांनी ही प्रात्यक्षिके सादर केली.
शिस्तबद्ध संचलनाने जिंकली मने! एनडीएचे दीक्षांत संचलन; सुखोई आणि मिराज विमानांची सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 4:38 AM