पुणे: स्वाईन फ्ल्यू, कोरोना पाठोपाठ आता ''गुइलेन बॅरे सिंड्रोम'' (जीबीएस) या दुर्मीळ आजाराचा पुण्यात शिरकाव झाला असून सिंहगड आणि धायरी परिसरात २४ रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणेतर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दूषित अन्न किंवा पाणी पिल्याने ''कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी'' संसर्ग होऊ शकतो. संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात दुखणे. तसेच काही व्यक्तींमध्ये, बॅक्टेरिया रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतो. यामध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया किंवा बॅक्टेरियासह इतर विषाणूंसारखे संक्रमण आहेत. ज्यामुळे गुइलेन-बॅरे सिंड्रोम आजार होण्याची शक्यता न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणेने वर्तवली आहे.
तसेच हा दुर्मीळ आजार ''उपचार करण्यायोग्य स्थितीत असल्याचे तज्ज्ञांनी जनतेला आश्वस्त केले असून घाबरू नये, असेही सांगितले आहे. त्याचप्रमाणे कोणालाही लक्षणे आढळल्यास, ताबडतोब न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेण्याचे आवाहन न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
जीबीएस म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती?
जीबीएस ही एक दुर्मीळ परंतु उपचार करण्यायोग्य न्यूरोलॉजिकल स्थिती आहे, ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मज्जातंतूंवर हल्ला होतो. ज्यामुळे मान, चेहरा आणि डोळ्यांमध्ये अशक्तपणा येणे, मुंग्या येणे किंवा सुन्न होणे, गंभीर प्रकरणांमध्ये चालायला त्रास होणे, अन्न पदार्थ गिळता न येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, अशी लक्षणे प्रामुख्याने जीबीएसमध्ये दिसतात.
गुइलेन-बॅरे सिंड्रोमची प्रमुख लक्षणे :
- पाय किंवा हातांमध्ये अचानक अशक्तपणा.- चालण्यात अडचण किंवा बधिरपणा.- सतत अतिसार, विशेषत: रक्तरंजित असल्यास.
काय आहेत मार्गदर्शक सूचना :
- पिण्यापूर्वी पाणी उकळून घ्या.- पाण्याच्या सुरक्षिततेबाबत खात्री नसल्यास बाटलीबंद पाणी वापरा.- भाज्या आणि फळे चांगले धुवा.- पोल्ट्री आणि मांस योग्य प्रकारे शिजवा- कच्चे किंवा कमी शिजलेले अन्न, विशेषतः अंडी आणि सीफूड टाळा.- जेवण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर साबणाने आणि पाण्याने हात धुवा.- बाहेरील अस्वच्छ बाबी हाताळताना काळजी घ्या.