पुनावाला अटकेत : २००६ मधले बॉम्बस्फोट प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २००६ मधील अहमदाबाद जिल्ह्यातील कालुपूर रेल्वे स्टेशन बॉम्बस्फोटप्रकरणी पुणे पोलिसांच्या मदतीने मोहसीन पूनावाला याला अटक केली. तब्बल १५ वर्षांनंतर पूनावाला याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गुजरात एटीएसने बॉम्बस्फोट प्रकरणातील पुण्यात वास्तव्यास असलेल्या एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची मदत मागितली होती. त्यानुसार वानवडी पोलिसांची मदत देण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.
२००६ च्या या बॉम्बस्फोट प्रकरणात फरार असलेल्या अब्दुल रज्जाक गाजी याला गुजरात एटीएसने बांगलादेशाच्या सीमेवरून ऑगस्ट २०२० मध्ये अटक केली होती. गाझीने पाकिस्तानची गुप्तहेर एजन्सीला मदत केल्याची एटीएसला माहिती मिळाली होती. या वेळी मोहसीन पूनावाला याच्याविषयीची माहिती समोर आली होती. तेव्हापासून पोलीस मोहसीनच्या मागावर होते. दरम्यान, तो वानवडी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वानवडी पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली.
गुजरात एटिएसच्या माहितीनुसार, गाजीने लष्कर ए तैयबा (एलईटी)चे सदस्य जुल्फिकार कागजी आणि अबु जुंदाल या दोघांना आश्रय दिला होता. त्याच्यावर फेब्रुवारी २००६ मध्ये कालुपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ च्या मध्यभागी बॉम्ब ठेवल्याचा आरोप आहे. या स्फोटात अनेक जण जखमी झाले होते.