शिरूर : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील गुजरमळा हा हॉटस्पाॅट ठरत असून या ठिकाणी गेल्या पाच दिवसांत २७ कोरोनाबाधित आढळले आहे. त्यामुळे मंगळवारी हा परिसर १४ दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
शिरूर शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असून, यावर आता शिरूर नगरपरिषद, शिरूर ग्रामीण रुग्णालय व तहसील कार्यालय या तीनही विभागाने कडक भूमिका घेण्याचे ठरवले आहे. तसेच जिल्हाधिकारी शिरूर प्रांताधिकारी यांनी याबाबत कडक नियमावली करण्यासाठी आदेश या खात्यांना ही दिले आहेत.
शिरूर शहरातील गुजर मळा याठिकाणी गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये २७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
त्यामुळे या भागात १४ दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
शिरूर शहरात २३ फेब्रुवारीपर्यंत ८१ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून, आजपर्यंत १०२९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरूर शहरातील जोशीवाडी, स्टेट बँक कॉलनी व गुजरमळा ही ठिकाणी कोरोना रुग्णांची हॉटस्पॉट ठरत आहे. शिरूर ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने संशयित रुग्णांनी कोरोना रॅपिड टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले आहे.
...तर दुकाने, हॉटेलवर कारवाई
शिरूर शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण निघत असून, हे चिंताजनक आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. ताप, सर्दी, खोकला यासह कोरोना संशयित रुग्ण असल्यास किंवा आढळल्यास त्यांनी त्वरित शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना चाचणी करून घ्यावी. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर पोलीस व शिरूर नगर परिषद प्रशासन यांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तसेच मास्क न वापरणे फिजिकल डिस्टन्स न ठेवणे, दुकानांमध्ये गर्दी करणे, सॅनिटायझर न ठेवणे असे आढळल्यास दुकानांवर, हॉटेलवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे शिरूर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.