.......
विकासासाठी विलिनीकरणाची आस
गुजर-निंबाळकरवाडी नागरीकरणाच्या प्रतीक्षेत
दीपक मुनोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एकीकडे डोंगरमाथ्याला भिडणारे खासगी गुळगुळीत रस्ते, तर दुसरीकडे गावातील मुख्य सार्वजनिक रस्त्याची दुर्दशा, असा विरोधाभास गुजर-निंबाळकरवाडीत दिसून येतो.
दाटवस्तीच्या कात्रज उपनगराशेजारी नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेली निंबाळकरवाडी-गुजरवाडी ही ग्रामपंचायत. वाढत्या औद्योगिकीकरण आणि नागरीकरणातही गावातील पर्यटन आणि नैसर्गिक संपत्ती गावकऱ्यांनी अबाधित राखली आहे. मात्र, पायाभूत सुविधांचा विकास होईल म्हणून आता विलिनीकरणाद्वारे गावाला नागरीकरणाची आस लागली आहे.
विलिनीकरणाच्या घोषणेनंतर गावात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. पावसाळ्यात गावातील ओढ्याला आलेल्या पुरात गावाची मोठी हानी झाली. अनेक वाहने वाहून गेली. त्यात अतिक्रमणांमुळे आणखीनच धोका निर्माण झाला.
असे असले, तरी गाव विलीन होणार म्हणून गावातील जमिनींचे भाव गगनाला भिडत आहेत.
कात्रज ग्रामपंचायत महापालिकेत विलीन झाल्यानंतर गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळाली. सुमारे सहा हजार लोकसंख्या असलेल्या गुजरवाडी-निंबाळकरवाडी गावात अजूनही पायाभूत सुविधा नाहीत. वार्षिक ७० लाखांचे उत्पन्न सुमारे असून सव्वापाचशे एकर इतके क्षेत्र आहे. गुजरवाडी, निंबाळकरवाडी, खोपडेनगर, सणसनगर, सोपाननगर आणि गुजरवाडी असे विभाग आहेत.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत गावातील मुख्य रस्त्यासाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर झाले असून काम सुरू आहे. अंतर्गत रस्त्यांची अवस्था मात्र अत्यंत दयनीय आहे.
अनेक ठिकाणी रस्ते फुटलेले असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.
गावात तिन्ही वाड्यांसाठी १० कोटी रुपये खर्च करून पुणे महापालिकेमार्फत ड्रेनेजची सुविधा देण्यात आली, तरी अंतिम जोड न दिल्याने फारसा उपयोग झालेला नाही. त्यामुळे सर्व सांडपाणी शेतीत अथवा रस्त्यावर सोडले जात आहे.
गावाच्या वरच्या भागात असलेल्या, पाझर तलावातून पाणीपुरवठा होतो. मात्र, हे पाणी पिण्यासाठी वापरत नाही. विलिनीकरणानंतर पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
कोट
गावातील अंतर्गत रस्ते अरुंद आहे. त्यातून अपघाताचा धोका संभवतो. आम्हाला दूषित पाणीपुरवठा होत असून महापालिकेने यात लक्ष घालावे.
-राजू दाभेकर, नागरिक
कात्रजला महापालिकेत समाविष्ट करून तिथे महापालिका पायाभूत सुविधा देऊ शकलेली नाही. या नवीन वाड्या आणि गावांना विलीन करून आपण अजून एक ‘नवीन दुखणं’ महापालिकेत घेत आहोत.
-वसंत मोरे
नगरसेवक, पुणे मनपा