राजगुरूनगर (पुणे) : गुळाणी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्यावरून तसेच ग्रामपंचायतमध्ये दप्तरी झालेल्या नोंद बदलून अभिलेख गहाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संगनमताने फसवणूकप्रकरणी तब्बल तीन माजी सरपंच आणि तीन ग्रामसेवकांवर खेड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुळाणी ग्रामपंचायतीत सन २००४ ते २०१९ या कालावधीत हा गुन्हा घडल्याचा आरोप ग्रामस्थ ॲड. ज्ञानेश्र्वर रोडे यांनी केला होता. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर पंचायत समिती प्रशासनाला मिळालेल्या न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सोमनाथ कारंडे यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
त्यावरून खेड पोलिसांनी माजी सरपंच दिलीप ढेरंगे, त्यांच्या पत्नी माजी सरपंच कुंदा ढेरंगे, माजी सरपंच बाळासाहेब सुतार तसेच ग्रामसेवक मनीषा वळसे, एस. टी. जोशी आणि अनिता आमराळे यांच्या विरोधात एकूण ८ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सरपंच, ग्रामसेवक यांनी अपहार केलेली ४७ हजार ३०७ रुपये रक्कम शासनाला परत केल्याचे सांगितले. याशिवाय गुळाणी गावात होणाऱ्या एका ५० लाख रुपये निधीच्या पाणीपुरवठा योजनेत पण्याची टाकी, पाइपलाइन न करता पैसे लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.