सुपे : मागील आठ दिवसांपासून होत असलेल्या तुरळक पावसामुळे गुलछडीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, बाजारभावातही मोठी घसरण झाल्याने शेतकरी हावालदिल झाला आहे.सुप्यासह बारावाड्या, तसेच कोळोली, नारोळी, काऱ्हाटी आणि वढाणे आदी परिसरातून सुमारे ७ ते ८ टन गुलछडीची फुले पुणे, तसेच मुंबई येथील फुलबाजारात विक्रीसाठी जात आहेत, अशी माहिती फुलांचे आडतदार वसंत चांदगुडे, तसेच फुल वाहतूकदार श्रीकांत व्यवहारे यांनी दिली. दरम्यान, काही शेतकरी सुपे येथील स्थानिक फुल व्यावसायिकांकडे फुले देतात, हीच फुले पुढे पुणे-मुंबई बाजारात विक्रीसाठी जातात. येथील स्थानिक व्यावसायिक येथील शेतकऱ्यांना पुणे बाजाराप्रमाणे बुधवारच्या आठवडे बाजार दिवशी फुलांची पट्टी देतात. मात्र, मागील पंधरवड्यात एका किलो मिळणारा बाजारभाव आत्ता वीस किलोला मिळत नसल्याची प्रतिक्रिया येथील शेतकऱ्यांनी दिली.मागील पंधरा दिवसांपूर्वी अक्षय तृतीयादरम्यान फुलांना सुमारे १५० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला. मात्र, या आठवड्यात सात आणि आठ रुपये बाजारभाव मिळाल्याची माहिती येथील स्थानिक फुल व्यावसायिक युवराज गडदे यांनी दिली. त्यांच्या फूल काट्यावर ३५ ते ४० किलो फुले एका दिवशी घालणारे सुमारे आठ ते दहा शेतकरी असल्याचे गडदे यांनी सांगितले. त्यांच्याकडे सद्या आवक वाढल्याने सुमारे एक टन फुले विक्रीसाठी येत आहेत. मागील पंधरवड्यात पावसाच्या अगोदर २५० ते ३०० किलो फुले विक्रीसाठी जात होती.
गुलछडी मातीमोल; प्रतिकिलोस ४ रुपये बाजारभाव
By admin | Published: June 22, 2015 4:24 AM