पुणे : नोकरीच्या आमिषाने पुण्यातील ३ महिलांना आखाती देशात नेऊन त्यांना डांबून ठेवून छळ केल्या प्रकरणातील दलालाला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मुंबईतील माहिममधून अटक केली. मोहम्मद फैय्याज अहमद याहया (वय २८, रा. ओशिवरा. मूळ रा. कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत दोन महिलांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फिर्यादी महिला मार्केटयार्ड परिसरात वास्तव्यास आहेत. चंदननगर भागातील एका महिलेने आखाती देशात जादा पगाराचे आमिष दाखवून सफाई कामगार म्हणून टुरिस्ट व्हिसावर सौदी अरेबियातील रियाधमध्ये एका अरबाकडे पाठविले. या दलालांनी महिलांची ४ लाख रुपयांत विक्री केली होती. नुकतीच या महिलांची सुटका करण्यात आली.
याबाबत दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी हा मुंबईत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलिस अंमलदार तुषार भिवकर, अमित जमदाडे यांचे पथक मुंबईला रवाना झाले. तांत्रिक तपासावरून पोलिसांनी आरोपी याह्या याला ताब्यात घेतले.
ही कामगिरी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश माळेगावे, अंमलदार राजेंद्र कुमावत, तुषार भिवरकर, अमित जमदाडे, मनिषा पुकाळे यांच्यासह पथकाने केली.