--
नीरा : गुळुंचे (ता. पुरंदर) ग्रापंचायतीची आर्थिक अनियमितता, पेठ रस्त्यावरील अतिक्रमण न काढणे, बेकायदा ग्रामसभा, तीन घरांच्या बोगस नोंदी घेणे, नवीन अतिक्रमणे निष्कसित करण्यास कसूर केल्याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने व्यथित झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा युवक उपाध्यक्ष अक्षय निगडे, नीरा गटाचे काँग्रेस पक्षाचे गटप्रमुख नितीन निगडे व इतरांनी आज पुरंदर पंचायत समितीपुढे सत्याग्रह करत दिवसभर ठिय्या मांडला. सरपंच व ग्रामसेवकांनी बोगस घरांच्या नोंदी घेतल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची आग्रही मागणी निगडे यांनी या वेळी केली.
गुळुंचे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये पार पडली. यात परिवर्तन घडवत सुरेश जगताप यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला चारी मुंड्या चित करत पंचायत समितीच्या माजी सभापती अजित निगडे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने नऊ जागांवर विजय संपादन करत यश मिळवले. यात जगताप यांच्या जवळच्या अनेक सहकाऱ्यांनी परिवर्तन पॅनलमध्ये प्रवेश केल्याने जगताप यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र नव्याने सत्तेत आलेल्या गावकरभाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवत कामकाज केल्याचे आता दिसून येत आहे. गावातील एकही रस्त्याची नोंद रस्ता रजिस्टरमध्ये नसतानाही गावातील अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात आली, सांसद आदर्श ग्राम योजनेतून भक्त निवास, महिला अस्मिता भवन व ज्येष्ठ नागरिक सभागृह यांची कामे त्रयस्थ व्यक्तीच्या जागेत करण्यात आली. त्यामुळे सरकारी निधीचा अपहार झाल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. नवीन म्हणून मालमत्ता रजिस्टरमध्ये नोंद घेतलेली तीन घरेच अस्तित्वात नसल्याचे दिसून आले आहे ; तर दुसरीकडे ३० डिसेंबर २०१९ रोजीची घेतलेली ग्रामसभा देखील बेकायदा असल्याचे विस्तार अधिकाऱ्यांच्या अहवालावरून सिद्ध झाले आहे.
या तीन वर्षात झालेल्या कामांची अंदाजपत्रके, मोजमापे उपलब्ध नसल्याचे दिसून आले असून जवळपास २२ लक्ष रुपयांची आर्थिक अनियमितता असल्याचा ठपका यापूर्वी भोरचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी ठेवला आहे. त्यावर देखील पुढे चौकशी झाली नसल्याने पंचायत समिती स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध तक्रारींचा निपटारा व्हावा यासाठी आज निगडे व इतरांनी धरणे आंदोलन केले.
दरम्यान, ८ मार्चपर्यंत सर्व चौकशी करण्याचे व तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी अमर माने यांनी दिले. पंचायत समितीच्या सदस्या सुनिता कोलते, पुरंदर तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदिप पोमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे - पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कर जाधव, काँग्रेसचे युवक अध्यक्ष सागर मोकाशी यांनी सत्याग्रह व आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, आगामी काळात पंचायत समिती सत्याची बाजू घेणार की जैसे थे परिस्थिती राहणार हे आता आगामी आठवड्यात कळून येईल.
--
कोट
भ्रष्ट व अनागोंदी कारभाराबाबत सरपंच व सदस्य मंडळावर कारवाई होणे आवश्यक असून बोगस घरांच्या नोंदी घेतल्याने त्यांच्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करावेत. अन्यथा आगामी ९ मार्चपासून पुन्हा आंदोलन केले जाणार आहे. प्रशासकीय यंत्रणा भ्रष्ट कारभाराला पाठीशी घालत असून हे लोकशाहीला काळिमा फासणारे कृत्य आहे.
- नितीन व अक्षय निगडे, गुळुंचे.