दौंड : येथील जागर व्याख्यानमालेत गीतकार गुलजार यांच्या काव्य साहित्यावर आधारित गीतांचा कलाविष्कार सादर करण्यात आला. दरम्यान, या कार्यक्रमांतर्गत गुलजार यांनी लिहिलेले साहित्य, त्यांचा जीवनपट आणि साहित्यानिर्मितीसाठी वाचनाच्या माध्यमातून घेतलेली त्यांनी मेहनत, असा त्यांच्या वयाच्या १३ व्या वर्षांपासून ते आजपर्यंतचा आढावा कार्यक्रमाचे निवेदक संदीप पंचवाडकर यांनी घेतला. दरम्यान, जितेंद्र भुरुक, राधिका अत्रे, शाकंबरी कीर्तिकर, विवेक पांडे यांनी गुलजार यांनी लिहिलेल्या गीतांचे सवाद्य गायन करून उपस्थितांच्या टाळ्यांची दाद मिळविली. दरम्यान, सुमारे तीन तास सुरू असलेल्या या कार्यक्रमात उपस्थित रसिकांनी मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती आणि कि. गु. कटारिया यांच्या प्रतिमेचे पूजन भीमथडी शिक्षण संस्थेचे चेअरमन विक्रम कटारिया यांनी केले.या वेळी गोविंदजी अगरवाल, सचिन मंत्री, आल्हाद पासलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भीमथडी शिक्षण संस्था, दौंड मेडिकल असोसिएशन आणि रचना नाट्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १७ वर्षांपासून सलग या व्याख्यानमालेचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जागर व्याख्यानमालेच्या बौद्धिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आलेख उंचावत चालला असून, त्यानुसार दिवसेंदिवस रसिकांची संख्याही वाढत चालली आहे.
गुलजार यांच्या गीतांनी रसिक झाले मंत्रमुग्ध
By admin | Published: October 04, 2016 1:31 AM