खडकवासला : गावागावंतील पोलीसपाटील यांनी ग्रामरक्षक दलास प्रोत्साहन देऊन पेट्रोलिंग केल्यास गुन्हे होणार नाहीत. तसेच ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांना पेट्रोलिंग करताना स्वसंरक्षणासाठी बंदूक परवाना देण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज दिली. हवेली पोलीस ठाण्याच्या वतीने सिंहगड रोडवरील अभिरुची येथे आयोजिलेल्या तक्रार निवारण मेळाव्यात ते बोलत होते.पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, की लहान-मोठ्या गुन्ह्यात गुन्हेगारांना रोखण्याचे मोठे आव्हान उभे असते. यासाठी गावागावातून ग्राम सुरक्षा दल, पोलीसमित्र समिती आणि महिला सुरक्षा समिती स्थापन करण्यात येणार आहे. ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांना रात्रीचे पेट्रोलिंग करावे, यासाठी स्वसंरक्षणासाठी जिल्ह्यातील खेडोपाडी असलेल्या ग्राम सुरक्षा दलाच्या जवानांना बंदूक परवाना दिला जाणार आहे. पोलिसांना ग्रामसुरक्षा दलाचे जवान मदत करीत आहेत. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून समाजात शांतता ठेवण्यासाठी परवाना दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिंहगड रोड, खडकवासला धरण व सिंहगडावरील वाहतूककोंडी सुरळीतसाठी विविध खात्यांच्या, तसेच पुणे शहर पोलिसांच्या समन्वयातून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. या मेळाव्याचे संयोजन हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी केले. सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, स्मिता पाटील, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, अनिता मुनोत, नितीन वाघ आदींसह सिंहगड, पश्चिम हवेली, पानशेत, खडकवासला भागातील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसुरक्षा दलाचे जवान, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उपस्थित होते.
ग्रामरक्षक दलांना बंदूक परवाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 1:41 AM