बेल्हा : बेल्हा येथे पिस्तुलाचा व कोयत्याचा धाक दाखवून ६ अज्ञात दरोडेखोरांनी ४ लाख रुपये रोख, एकूण ४९ तोळे दागिने लुटून दरोडा टाकल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबत आळेफाटा पोलिस स्टेशनमध्ये सदाशिव रामभाऊ बोरचटे यांनी फिर्यादी दिली आहे. बेल्हा (ता. जुन्नर) कल्याण-नगर महामार्गावर आमचा रामटेक नावाचा बंगला असून सोमवार ( दि.१९) रोजी पहाटेच्या रात्री २ वाजण्याच्या सुमारास या ६ दरोडेखोरांनी कंपाऊंडची जाळी कट केली. आत येऊन खिडकीचे लोखंडी गज कापून प्रवेश केला. त्यानंतर घरातील दाराची कडी तोडत असतानाच पत्नी सुरेखा बोरचटे हिला काही तरी पडल्याचा आवाज आल्याने ती बेडरूमच्या बाहेर आली. तिला घरात चोरटे आल्याचे दिसले. सुमितलाही दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवून खालच्या खोलीत जिन्यावरून खाली आणत असल्याचे दिसले. वडील रामभाऊ हे आरडाओरडा झाल्याने ते बाहेर आले असता दरोडेखोरांनी त्यांनाही लगेच पकडले. सोन्याची चैन व अंगठ्या बळजबरीने काढून घेतल्या. तसेच वडिलांच्या खिशात असलेले दीड लाख रुपये, मुलगा सुमित याच्या कपाटात असलले दीड लाख रुपये व सदाशिव यांच्या जवळ असलेले १ लाख रुपये असे एकूण ४ चार लाख रुपये चोरले. तसेच घरात असलेल्या कपाटात एकूण २८ लाख ५० हजार रुपये किमतीचे ४९ तोळे सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी चोरले. त्यांचे मोबाईलही बाहेर फेकून दिले होते. दरोडेखोरांनी घरातील सर्व खोल्यांची व घरातील कपाटाची उपकाराची केली व घरामध्ये असणारे पैसे व दागदागिने काढून घेतले. तसेच घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकून दिले होते. त्यांच्या घरात दरोडेखोर जवळपास दीड तास होते.
दरोडेखोरांनी बाहेर असलेली त्यांची स्विफ्ट (एम.एच.१४ डि. एक्स ६५९५) गाडी या चार चाकी गाडीची चाबी घेतली व घरातील सर्वांना एका खोलीत बंद करून बाहेरून कडी लावून निघून गेले. शेजाऱ्यांच्या घरालाही बाहेरून कडी लावून घेतली होती. दरोडेखोरांनी त्यांची गाडी अर्धा किलोमीटर अंतरावर सोडली. या ठिकाणी दुपारी श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञ पथकही आले होते. चोरटे निघून गेल्यावर शेजाऱ्यांच्या मदतीने इतरांना फोन करून माहिती देऊन बेडरूमचा दरवाजा उघडण्यास सांगितले. या ठिकाणी पहाटेच आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांनी भेट देऊन पंचनामा करून शोध तपासाची चक्रे फिरवत शोध चालू केला. परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.