पुणे :विश्रांतवाडी, येरवडा आणि विमानतळ पाेलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारी कृत्य करीत नागरिकांत दहशत निर्माण करणाऱ्या गुंड राज भवार टाेळीवर माेक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
टाेळीप्रमुख राज रवींद्र भवार (वय २४), जयेश उमेश भाेसले (वय १९, रा. पत्राचाळ, धानाेरी राेड, विश्रांतवाडी ), सुमित सुभाष साळवे (वय १९, रा. रामवाडी), गाैरव सुनील कदम (वय २२, छत्रपती शाहू साेसायटी, धानाेरी राेड, विश्रांतवाडी ), अकबर आयुब शेख (वय २१, रा. वडारवस्ती, विश्रांतवाडी) यांच्यासह तीन अल्पवयीन मुले यांच्याविराेधात ही कारवाई करण्यात आली आहे. सर्व आराेपींविराेधात गुन्हे दाखल आहेत.
गुंड राज भवार याने त्याच्या इतर साथीदारांच्या साेबत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदा जमाव जमवून नागरिकांच्या मालमत्तांचे नुकसान करणे तसेच प्रतिबंधात्मक कारवाईचा भंग करणे आदी स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. आराेपींविराेधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कलम वाढविण्यासंदर्भात विश्रांतवाडी पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे सादर केला हाेता. पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पाेलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी त्याला मान्यता दिली.
दाेन वर्षात १११ टाेळ्यांवर कारवाई
पुणे शहर पाेलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी गुंडांच्या टाेळीवर माेक्कांतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केली. या वर्षातील ही ४८ वी कारवाई असून गत दाेन वर्षात १११ गुन्हेगारी टाेळ्यांवर माेक्कांतर्गत कारवाई केली आहे.